मेट्रो लाईन-९चा पहिला टप्पा सुरू; मुंबई-मीरा-भाईंदर प्रवास जलद -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Date:

मुंबई, दि. ७ : दहिसर पूर्व ते काशीगाव या ४.७ किलोमीटर लांबीच्या मार्गिकेवर चार स्थानकांसह आजपासून मेट्रो सेवा सुरू झाली आहे. यामुळे मुंबई आणि मीरा-भाईंदर हा प्रवास जलद होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेट्रो लाईन-९ च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. ‍आशिष शेलार, बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या महापौर रितू तावडे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार संजय उपाध्याय, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या टप्प्यात दहिसर पूर्व, पांडुरंगवाडी, मीरागाव आणि काशीगाव अशी स्थानके असून, ही मेट्रो लाईन-७ शी जोडली गेल्याने प्रवाशांना अधिक चांगली संलग्नता मिळणार आहे. दुसऱ्या टप्प्यात साईबाबा नगर ते सुभाषचंद्र बोस मैदान या मार्गाचे काम ९६ टक्के पूर्ण झाले असून, याच वर्षात त्याचेही उद्घाटन करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. सुमारे ६,६०७ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे सध्या एक ते दोन तास लागणारा प्रवास केवळ ३० मिनिटांत पूर्ण होणार आहे. पुढील टप्प्यांमध्ये ही मेट्रो लाईन-३ शी जोडली जाणार असून, मीरा भाईंदर ते कुलाबा दरम्यान सीमलेस प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

मेट्रो सेवेत कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य देण्यात आले असून, सध्या ८० टक्के तिकीट व्यवहार डिजिटल पद्धतीने होत आहेत. स्मार्ट कार्ड आणि ‘वन कार्ड’ प्रणालीमुळे एकात्मिक वाहतूक व्यवस्थेला चालना मिळत आहे. हा प्रकल्प सौर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, एलईडी लाईटिंग आणि रिजेनरेटिव्ह ब्रेकिंग यांसारख्या तंत्रज्ञानामुळे हरित प्रकल्प ठरत आहे. तसेच नागपूरप्रमाणेच मेट्रो आणि फ्लायओव्हर एका पिलरवर उभारण्याची डबल डेकर रचना येथेही वापरण्यात आली आहे.

या प्रकल्पामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. सध्या मुंबईत १०० किलोमीटरहून अधिक मेट्रो मार्ग कार्यान्वित झाले असून, देशात दिल्ली नंतर मुंबई दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. पुढील काही वर्षांत आणखी प्रकल्प पूर्ण होऊन मुंबईतील मेट्रो जाळे अधिक विस्तारणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी एमएमआरडीए, संबंधित महानगरपालिका, कंत्राटदार आणि मजूर यांचे योगदानाबद्दल आभार मानून ही मेट्रो सेवा मुंबईकरांना समर्पित केली असल्याची घोषणा केली.

मुंबईएमएमआर कनेक्टिव्हिटीला मोठी चालना – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दहिसर ते काशीगाव दरम्यानच्या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनामुळे मुंबई आणि एमएमआर परिसरातील कनेक्टिव्हिटीला मोठी चालना मिळाली असून हा दिवस दहिसर व मीरा-भाईंदरमधील नागरिकांसाठी ऐतिहासिक ठरल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

ही मेट्रो दहिसर स्थानकावरून मेट्रो 2A आणि मेट्रो 7 शी जोडली गेली असून पुढील काळात मेट्रो 7A, मेट्रो 3 द्वारे कुलाबा आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट थेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात एकात्मिक मेट्रो जाळे तयार होणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

राज्यातील मेट्रो नेटवर्क सध्या 101 किलोमीटरपर्यंत पोहोचले असून भविष्यात ते 337 किलोमीटरपर्यंत विस्तारण्याचे उद्दिष्ट आहे. हे नेटवर्क पूर्ण झाल्यानंतर मुंबईचे मेट्रो जाळे जगातील अग्रगण्य ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

मेट्रो प्रकल्पामुळे रस्त्यावरील वाहतूक 20 ते 30 टक्क्यांनी कमी होईल, इंधन बचत होईल, प्रदूषण घटेल आणि नागरिकांचा वेळ वाचेल. त्यामुळे कामकाजाची कार्यक्षमता वाढून नागरिकांना कुटुंबासाठी अधिक वेळ देता येईल, असेही त्यांनी सांगितले.

प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भूमी संपादन व पुनर्वसनासारखी आव्हाने पार करत शासनाने गतीने काम केल्याचे सांगून त्यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित यंत्रणांचे अभिनंदन केले. हा लोकहिताचा प्रकल्प असून नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

मुंबईकरांसाठी ही मेट्रो मोठी दिलासा देणारी ठरणार असून भविष्यात संपूर्ण एमएमआर परिसरातील प्रवास अधिक सुलभ आणि वेगवान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दहिसर पूर्व ते काशीगाव या मेट्रो ९ प्रकल्पाचे लोकार्पण केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवरांनी मेट्रोने प्रवास केला.

मेट्रो लाईन ९ (दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर)

* लांबी: १०.५ कि.मी. (उन्नत)

एकूण स्थानके:८

* स्थानाकांची नावे: दहिसर (पूर्व), पांडुरंगवाडी, मिरागांव, काशिगांव, साई बाबा नगर, मंदितियानगर, शहीद भगत सिंग उद्यान आणि नेताजी सुभाष चंद्र बोस उद्यान

फेज १ (दहिसर ते काशीगांव):

  • लांबी: ४.७ कि.मी.
  • स्थानके: ४
  • स्थानाकांची नावे: दहिसर (पूर्व ), पांडुरंगवाडी, मिरागांव, काशीगांव

कनेक्टिव्हिटी:

  • रेड लाईन कनेक्शन: मेट्रो मार्ग-९ हा मेट्रो मार्ग-७ (दहिसर पूर्व–अंधेरी पूर्व) आणि मार्ग-७अ (अंधेरी पूर्व–छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ) यांच्या माध्यमातून ‘रेड लाईन’शी जोडला जातो; यामुळे मीरा-भाईंदर आणि विमानतळ एकमेकांशी जोडले जातात.
  • पश्चिम द्रुतगती महामार्ग (WEH) लिंक आणि इंटरचेंज: लाइन-९ ही पश्चिम द्रुतगती महामार्गच्या बाजूने मेट्रो मार्ग-७ ला जोडली जाते; यामध्ये दहिसर (पूर्व ) येथे इंटरचेंज असून, हे मेट्रो मार्गावरील एक प्रमुख केंद्र आहे.
  • टप्पा -१ मार्ग: काशिगांव पर्यंत विस्तारल्यामुळे प्रवाशांना पश्चिम द्रुतगती महामार्गवर अंधेरी (पू) पर्यंत थेट आणि सोपा मार्ग उपलब्ध होईल.
  • या एकत्रित नेटवर्कमुळे प्रवाशांना विविध मोड्समध्ये बदल न करता सहज प्रवास करता येईल.
  • या योजनेचा एक प्रमुख फायदा म्हणजे, दहिसर टोल प्लाझा येथील प्रचंड वाहतूक कोंडी कमी होईल. अधिक थेट आणि कार्यक्षम मेट्रो जोडणीमुळे, रस्त्यांवर येणाऱ्या वाहनांची संख्या कमी होऊ शकते; परिणामी, गर्दीच्या वेळी (peak hours) वाहतूक कोंडी कमी होऊन वाहतुकीचा प्रवाह अधिक सुरळीत होईल.
  • वाहतुकीतील या सुधारणेमुळे, मीरा-भाईंदरमधील प्रवाशांना प्रवासाचा अधिक सुखद अनुभव मिळू शकेल.काशिगांव ते इतर महत्वाच्या ठिकाणी थेट मेट्रो कनेक्शनमुळे प्रवास वेळ कमी होईल, विद्यार्थ्यांसाठी आणि दैनंदिन प्रवाशांसाठी अधिक सोयीस्कर ठरेल.
  • टप्पा -१, मेट्रो लाईन-९ रोजच्या प्रवाशांच्या २०–३०% प्रवासाला रोडवरून मेट्रोकडे वळवेल.
  • गर्दीच्या वेळी (peak hours), यामुळे वाहतूक कोंडी १०–१५ टक्क्यांनी कमी होऊ शकते; परिणामी, वाहनांची हालचाल अधिक वेगवान होईल आणि वाहतूक ठप्प होण्याच्या घटना कमी होतील.
  • ही मेट्रो मार्गिका बस, ऑटोरिक्षा आणि इतर मेट्रो मार्गांशी अखंडपणे जोडलेली असेल; परिणामी, प्रवाशांना खाजगी वाहनांवर अवलंबून न राहता आपल्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध होतील.
  • हा पहिला टप्पा संपूर्ण ‘MBVV(मीरा-भायंदर-वसई-विरार)’ मेट्रो कॉरिडॉरचा मार्ग प्रशस्त करतो, ज्यामुळे मीरा-भाईंदर आणि त्याच्या लगतच्या परिसरातील कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय सुधारणा होईल.

प्रवाशांसाठी सुविधा:

  • लिफ्ट्स, सरकते जिने (एस्केलेटर्स), सीसीटीव्ही पाळत, दिव्यांग प्रवाशांसाठी सुविधा, आधुनिक फलक आणि प्रकाशमान स्थानक परिसर—या बाबी सुरक्षा व सुलभता वृद्धिंगत करतात.

हरित गतिशीलता आणि उत्सर्जन घट

रस्त्यावरून रेल्वेकडे बदल: मेट्रो लाईन-९ उच्च क्षमतेची सार्वजनिक वाहतूक पुरवते, ज्यामुळे पूर्व उपनगरांमध्ये खाजगी वाहनांचा वापर, वाहतूक कोंडी, इंधनाचा वापर आणि वाहनांच्या एक्झॉस्ट पाईपमधून होणारे उत्सर्जन यामध्ये लक्षणीय घट होते.

कमी कार्बन फूटप्रिंट: रस्त्यावरील वाहतुकीच्या तुलनेत, इलेक्ट्रिक मेट्रोच्या संचालनामुळे प्रति प्रवासी-किमी CO₂ आणि सूक्ष्म कणांच्या उत्सर्जनात लक्षणीय घट होते.

ऊर्जा-कार्यक्षम प्रणाली:

  • रिजनरेटिव्ह ब्रेकिंग: रेल्वे गाड्या रिजनरेटिव्ह ब्रेकिंग प्रणालीने सुसज्ज आहेत, ज्यामुळे ब्रेकिंगमधील ऊर्जा पुनर्प्राप्त करून ट्रॅक्शन पॉवर नेटवर्कमध्ये तिचा पुनर्वापर करणे शक्य होते, परिणामी एकूण ऊर्जेचा वापर कमी होतो.
  • ऊर्जा-कार्यक्षम स्टेशन रचना: स्टेशनची रचना ऊर्जा-कार्यक्षम प्रकाशयोजना आणि अनुकूलित विद्युत मांडणीसह केली आहे, ज्यामुळे कार्यान्वयनासाठी लागणारी विजेची मागणी कमी होते.
  • केंद्रीकृत SCADA देखरेख: SCADA द्वारे रिअल-टाइम ऊर्जा आणि प्रणालीच्या देखरेखीमुळे कार्यक्षम वीज व्यवस्थापन आणि दोषांचे त्वरित निदान शक्य होते, ज्यामुळे ऊर्जेचा अपव्यय कमी होतो.

प्रवासी-केंद्रित शाश्वत रचना:

  • सार्वत्रिक सुलभता: अडथळामुक्त प्रवेश (लिफ्ट, रॅम्प, स्पर्शक्षम मार्ग) सार्वजनिक वाहतुकीच्या सर्वसमावेशक आणि न्याय्य वापरास प्रोत्साहन देतो.
  • आवाज आणि कंपन नियंत्रण: आधुनिक ट्रॅकची रचना आणि वाहनांची श्रेणी आवाज आणि कंपनाची पातळी कमी करते, ज्यामुळे सभोवतालच्या शहरी पर्यावरणाची गुणवत्ता सुधारते.
  • वर्धित सुरक्षा आणि निगराणी: सीसीटीव्ही आणि पुरेसा प्रकाश असलेली स्थानके सार्वजनिक वाहतुकीचा अधिक अवलंब करण्यास प्रोत्साहन देतात, ज्यामुळे अप्रत्यक्षपणे शाश्वत गतिशीलतेच्या पर्यायांना समर्थन मिळते.

प्रकल्पाचे फायदे:

* प्रवाशांसाठी सुरक्षित, आरामदायक आणि सुलभ प्रवास.

* बहुविध वाहतुकीचे उत्कृष्ट एकीकरण (मल्टी मोडल इंटिग्रेशन).

* कार्बन उत्सर्जनात घट होईल.

* वाहतूक कोंडी कमी होईल.

* प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भारतीय जनगणना-२०२७ करिता ‘HLO मोबाईल अॅप्लिकेशन’वापर करावा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. ७: भारतीय जनगणना -२०२७ च्या अनुषंगाने माहितीचे...

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) २०२६ – तिसरा टप्पा जाहीर; तरुणांसाठी मोठी संधी

पुणे, दि. 7 : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री इंटर्नशिप...

“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

• उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई, दि. ७ :...

श्री क्षेत्र भिमाशंकर मंदिराच्या भव्य सभामंडप उभारणीचे काम व परिसर विकास कामे वेगाने सुरू

भाविकांना नित्यदर्शनाकरिता मंदिर ३१ मे २०२६ पर्यंत बंद ठेवण्याचा...