पुणे-बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून दिवंगत नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. येथील निवडणूक बिनविरोध करून अजित पवारांना श्रद्धांजली देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. असे असतानाही कॉंग्रेसने उमेदवार जाहीर केला. यावरून आता पार्थ पवारांनी थेट कॉंग्रेसला इशाराच दिला आहे.
पार्थ पवार म्हणाले, माझे कोणाशी बोलणे झाले नाही. कॉंग्रेसला कळायला पाहिजे, काय करायचे ते. त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाबाबत मला माहीत नाही. सगळे मोठे लोक आहेत. सर्वांना माहीती आहे काय चालले आहे. त्यांनी विचार केला असेल तर करू द्या. पण त्यांना नंतर काय त्रास होईल महाराष्ट्रात, हे त्यांना दिसेल, अशा शब्दात पार्थ पवारांनी नाराजी व्यक्त करत इशारा दिला आहे.
पुढे बोलताना पार्थ पवार म्हणाले, जे दादांसाठीचे प्रेम आहे लोकांच्या मनात, ते लोक विसरत नाहीत. अशावेळी एवढ्या मॅच्युअर पार्टीने हा निर्णय घेणे, जिथे एवढे मोठे नेते आहेत, अतिशय चुकीचे आहे. मला वाटते की आपण कोणाला थांबवू शकत नाही. जशी वेळ येते तसे सामोरे जावे लागते. आम्ही सामोरे जाऊ, आम्ही काही कोणाला फोन करणार नाही, जे काही नशिबात लिहिले आहे ते बघू. फक्त मला वाईट वाटत आहे की कॉंग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल सुरू आहे.
दरम्यान, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने रविवारी आकाश मोरे यांची उमेदवारी जाहीर केली असून, यामुळे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचे शिष्टाईचे प्रयत्न अपयशी ठरल्याचे दिसत आहे. उमेदवारीची अधिकृत घोषणा दिल्लीतून होण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी स्वतः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून बारामतीत उमेदवार न देता महायुतीला पाठिंबा देण्याची विनंती केली होती. मात्र, काँग्रेसने आपला स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतल्याने सुनेत्रा पवार यांची ही मध्यस्थी निष्फळ ठरली आहे.

