विकासासोबतच निसर्गाचेही जतन
पुणे: पुणे महानगर व पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीचा कणा ठरू पाहणाऱ्या ‘माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग-३’ च्या कामात केवळ पायाभूत विकासालाच नव्हे, तर पर्यावरण संवर्धनालाही पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) तितकेच प्राधान्य दिले जात आहे. या प्रकल्पांतर्गत बाधित झालेल्या झाडांच्या बदल्यात तब्बल ५ हजार ५०० नवीन वृक्षांची लागवड करण्यात आली असून, या नव्याने लावलेल्या वृक्षांचे जगण्याचे प्रमाण १०० टक्के असल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे.
मेट्रो मार्गावरील खांब (पियर्स), स्थानके आणि जिन्यांच्या उभारणीमध्ये एकूण १,३०५ झाडे बाधित झाली होती. पीएमआरडीएने पर्यावरणपूरक भूमिका घेत यापैकी केवळ ५५७ झाडे तोडली, तर उर्वरित ७४८ झाडांचे सुरक्षितरीत्या पुनर्रोपण केले. तसेच, पर्यावरणाची हानी भरून काढण्यासाठी तब्बल ५,५०० नवीन झाडे लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. ही नवीन झाडे पशुसंवर्धन विभाग, ताथवडे येथील कास्टिंग यार्ड, बावधनचे एनडीए वनक्षेत्र, एनसीएल, पंचवटी, हिंजवडी फेज-३ मधील एमआयडीसी प्लॉट, राजभवन आणि कृषी महाविद्यालय यांसारख्या शहराच्या विविध भागांत लावण्यात आली आहेत.
या मोहिमेत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला असून सर्व वृक्षांचे ‘जिओटॅगिंग’ करण्यात आले आहे. प्रत्येक झाडावर एक ‘क्यूआर कोड’ लावण्यात आला आहे. नागरिकांनी मोबाईलवरून हा क्यूआर कोड स्कॅन केल्यास, त्यांना संबंधित वृक्षाचे नाव, त्याची प्रजाती आणि त्याचे पर्यावरणातील महत्त्व (फायदे) याबाबतची सविस्तर माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते. कंत्राटदार आणि ‘सायन्स अँड टेक पार्क’ यांच्या संयुक्त विद्यमाने या सर्व वृक्षांचा सविस्तर डेटाबेस तयार करण्यात आला आहे.
पुनर्रोपित झाडांना आली फळे-फुले!
नव्याने लागवड केलेल्या सर्व ५,५०० वृक्षांनी मूळ धरले असून ते १०० टक्के जगले आहेत. तर, पुनर्रोपण केलेल्या वृक्षांचे जगण्याचे प्रमाणही ८० टक्के इतके नोंदवले गेले आहे. हिंजवडी फेज-२ मधील वनक्षेत्रात सर्वाधिक म्हणजे सुमारे ३,००० झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले होते. विशेष म्हणजे या झाडांना आता फुले आणि फळे येण्यास सुरुवात झाली असून, हे या पर्यावरण मोहिमेच्या यशाचे मोठे द्योतक मानले जात आहे. मेट्रोच्या या प्रकल्पामुळे पायाभूत विकासकामांसोबतच पर्यावरणाचा समतोल कसा राखता येतो, याचा एक उत्तम आणि अनुकरणीय वस्तुपाठ समोर आला असून, शाश्वत विकासाच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.
“मेट्रो प्रकल्पामुळे होणारा पायाभूत विकास आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. पुनर्रोपित झाडांना आलेली फळे-फुले हे या मोहिमेच्या यशाचे गमक आहे.”
— डॉ. अभिजीत चौधरी, महानगर आयुक्त, पीएमआरडीए, पुणे

