पुणे- दरवर्षीच पाऊस पडतो पण जेव्हा जेव्हा तो कोसळतो तेव्हा तेव्हा महापालिकेचे वाभाडे काढतो अशी स्थिती कायम दिसली आहे . ड्रेनेज विभागाचा नेहमीचा फज्जा उडतो या विभागाची लाज रस्त्यावर येते .आता याच विभागात गेली १७ वर्षे कार्यरत असणारे जगदीश खानोरेआणि अनेक टेंडर घेणारे एम. बी. पाटील आणि संदीप पटेल यांच्या सर्व व्यवहाराची आणि केलेल्या कामाची अँटी करप्शन ब्युरो मार्फत चौकशी करणे आवश्यक आहे.असे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी म्हटले आहे.
महानगरपालिकेच्या ड्रेनेज विभागामार्फत गेल्या चार वर्षांत झालेल्या हजारो कोटी रुपयांच्या खर्चाची सखोल चौकशी करण्याची आणि तातडीने नैमित्तिक समिती स्थापन करण्याची मागणी त्यांनी नुकतीच केली होती .
प्रशासक काळात ड्रेनेज विभागाचे वार्षिक बजेट सुमारे साडेसातशे कोटी रुपये होते. त्यामुळे गेल्या चार वर्षांत तब्बल ३००० कोटी रुपयांचा खर्च झाल्याचा अंदाज आहे. याशिवाय, ‘जायका’ प्रकल्पासाठी या वर्षाअखेर ९०० कोटी रुपये खर्च झाले असून, चालू वर्षात इतर कामे कमी करून २८९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

