केंद्रीय राज्यमंत्री मा.ना.रामदास आठवले साहेबांकडून शैक्षणिक संस्थेचे कौतुक
पुणे : संविधानाबद्दल विद्यार्थ्यांना बालवयातच शिक्षित करीत सामाजिक-शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी प्रेरित करणारी शैक्षणिक संस्था समाज निर्मितीसह देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावतेय, अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांनी चलवादी शिक्षण संस्थेच्या ‘पुणे इंटरनॅशनल स्कूल अॅड ज्युनियर कॉलेज’च्या कार्याचे कौतुक केले.
शिक्षण संस्थेच्या नव्याने उभारण्यात आलेल्या कार्यालयाचे उदघाटन आठवले यांच्या हस्ते शनिवारी मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार सोहळ्यातून पार पडले.यावेळी विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातून शैक्षणिक संस्थेची संस्कृती संवर्धनासाठीची कटिबद्धता दिसून आली.
उदघाटन सोहळ्यासाठी आठवले यांचे मुख्य प्रवेशद्वारावर आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीने आणि विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाच्या तालबद्ध स्वागताने वातावरणात रंगत चढली. प्रवेशद्वारावर पाच सुवासिनींकडून औक्षण करीत, बॅच लावून आणि पुष्पगुच्छ देवून औपचारिक स्वागत करण्यात आले. यानंतर फीत कापून नवीन कार्यालयाचे उद्घाटन केले.
उद्घाटनानंतर कार्यालयातील तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीला पुष्प अर्पण करीत वंदन करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच संस्थेचे संस्थापक मरीअप्पा चलवादी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.उदघाटनानंतर सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी कला क्षेत्रात शाळेने केलेली प्रगती दाखवून दिली. कार्यक्रमांची सुरूवात भतरनाट्यातून गणेश वंदनेच्या सादरीकरणातून झाली.
‘मी जिजाई बोलते’ हे प्रभावी एकपात्री सादरीकरण राजश्री शेलार यांनी केले. यासोबतच सर्व शिक्षकांकडून “दोनच राजे इथे गाजले…” हे गीत सादर करीत पाहुण्याचे स्वागत केले. लहान गटातील विद्यार्थ्यांकडून संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचनही करण्यात आले.
पुणे इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन हुलगेश चलवादी यांच्या हस्ते व उपाध्यक्ष ॲड.रेणुका चलवादी, स्वप्नील शिर्के यांच्या हस्ते इतर मान्यवरांच्या उपस्थितीत रामदास आठवले यांचा तथागत गौतम बुद्धांची मूर्ती , महात्मा फुले पगडी , संविधान, शाल , स्कूल डायरी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. मा.आठवले साहेबांसोबत असलेल्या सर्व मान्यवरांचा शैक्षणिक संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
शैक्षणिक संस्थेच्या इमारतीचे सर्व आर्किटेक्चरल काम करणारे आर्किटेक सोमनाथ केरूर आणि सदाशिव कुलकर्णी यांना मा.आठवले साहेबांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व उपमुख्याध्यापकांनी कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी अतूट प्रयत्न केले.
कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात चेअरमन हुलगेश चलवादी यांच्या प्रेरणादायी भाषणाने झाली. सूत्रसंचालन डॉ उल्हास औटी यांनी तर आभार प्राचार्या सौ.स्मिता लोंढे यांनी मानले.हा सोहळा शाळेच्या प्रगतीचा आणि शैक्षणिक वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून,विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा आणि उत्साह निर्माण करणारा ठरला, असे समाधान संस्थाचालकांकडून व्यक्त करण्यात आले.

