मुंबई-
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवारी देण्याबाबत काँग्रेस पक्ष ठाम असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले आहे. या आधी पक्षाची जी भूमिका होती, त्याच भूमिकेवर काँग्रेस पक्ष ठाम असल्याचे देखील त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
वास्तविक या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या वतीने तसेच अजित पवार यांच्या पक्षाच्या वतीने ही निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ही निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली होती. मात्र तरी देखील काँग्रेस पक्षाची भूमिका ठाम असल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेस उमेदवार देणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
बारामती विधानसभा पोटनिवडणूक संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शशिकांत शिंदे यांना आमची भावना कळवली असल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. यासंदर्भात चर्चा जरी सुरू असली तरी पक्षाने दोन्ही ठिकाणी उमेदवारांची चाचपणी केलेली आहे. उद्यापर्यंत उमेदवाराच नाव काँग्रेस पक्षाच्या वतीने अंतिम करणार असल्याचं हर्षवर्धन सपकाळ सांगितले आहे. या पोटनिवडणूक संदर्भाची जी भूमिका होती त्या भूमिकेवर काँग्रेस पक्षात ठाम आहे. या संदर्भात राज्यस्तरावर तसेच राष्ट्रीय स्तरावर देखील सर्व नेत्यांशी चर्चा झाली असल्याचे सपकाळ यांनी सांगितलं. त्यामुळे या संदर्भात उद्या दुपारपर्यंत निर्णय घेतला जाईल, असे देखील ते म्हणाले.
मन मोठे करून पाठिंबा दिला पाहिजे:फडणवीसांचे आवाहन
या संदर्भात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सर्वच पक्षांनी सुनेत्रा ताईंना पाठिंबा दिला पाहिजे. माझी अशी सर्वांना विनंती असेल की, ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशा पद्धतीने परिस्थित होईल. यापूर्वी अनेक वेळा महाराष्ट्राने बिनविरोध पोटनिवडणूक केलेली आहे. मला आठवतं की, ज्या वेळेस आर. आर. आबांचे दुःखद निधन झालं होतं. त्यावेळी आपण पोटनिवडणूक बिनविरोध केली होती. भाजपने ठरवले होते की, निवडणूक लढणार नाही. त्यामुळे सर्वच पक्षांनी मन मोठे करून बिनविरोध निवडणूक करायला हवी, असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

