नाशिक- जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात अत्यंत धक्कादायक अपघात घडला आहे. पाण्याने भरलेल्या विहिरीत कार कोसळल्याने 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना दिंडोरी शहरातील शिवाजीनगर परिसरात घडली. संबंधित कार थेट विहिरीत पडल्याने प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.या दुर्घटनेत मृतांची नावे अशी आहेत: सुनील दत्तात्रय दरगोडे (32), रेशमा सुनील दरगोडे (27), आशा अनिल दरगोडे (32), गुणवती सुनील दरगोडे (11), श्रेयश अनिल दरगोडे (11), श्रावणी अनिल दरगोडे (11), सृष्टी अनिल दरगोडे (14), समृद्धी राजेंद्र दरगोडे (7) आणि श्रद्धा अनिल दरगोडे (13). सर्वजण इंदोरे, ता. दिंडोरी येथील रहिवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, इंदोर गावातील सुनील दत्तू दरगोडे यांच्या कुटुंबीयांसह नातेवाईक एका खासगी क्लासच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमावरून परतत होते. याच दरम्यान चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार रस्त्याबाहेर जाऊन पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की, कार थेट पाण्यात बुडाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
या अपघातात लहान मुलांसह महिलांचाही समावेश असल्याने दुःख व्यक्त केले जात आहे. मृतांमध्ये तीन चिमुकल्यांचा आणि दोन महिलांचा समावेश आहे. तसेच, एकाच कुटुंबातील पाच जणांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. मृतांची ओळख राखी सुनील दरगोडे, श्रद्धा अनिल दरगोडे, श्रावणी अनिल दरगोडे, सुनील दत्तू दरगोडे, उषा अनिल दरगोडे आणि त्यांच्या चार नातेवाईक अशी झाली आहे. हे सर्वजण दिंडोरी तालुक्यातील इंदोर गावचे रहिवासी होते.
दरम्यान, अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. स्थानिक नागरिकांसह प्रशासनानेही मदतकार्य हाती घेतले. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या मोहिमेत क्रेनच्या सहाय्याने कार विहिरीतून बाहेर काढण्यात आली. मात्र, तोपर्यंत कारमधील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला होता. अंधारामुळे आणि विहिरीत पाणी असल्यामुळे बचावकार्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या.
घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्याचे काम केले. संबंधित कार ही मारुती सुझुकी अर्टिगा (MH15-JS-1053) असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण दिंडोरी परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, विहीर मालकाच्या नातेवाईकांनीही आपली बाजू मांडली. ॲड. विक्रम राजे यांनी सांगितले की, ही विहीर 1972 पासून अस्तित्वात असून दुष्काळाच्या काळात गावासाठी पाण्याचा महत्त्वाचा स्रोत ठरली होती. विहिरीवर पूर्वी जाळी आणि अँगल बसवण्यात आले होते, मात्र ते कोणीतरी काढून नेल्याचा दावा त्यांनी केला. तसेच या रस्त्यावर संरक्षणासाठी जाळी बसवण्याची मागणी त्यांनीही नगरपंचायतीकडे केली होती, असे त्यांनी स्पष्ट केले.

