सकल हिंदू समाज मानाजी नगर आयोजित विराट हिंदू संमेलन
पुणे : भीती वाटावे असे वातावरण देशात असताना २०१४ साली स्वातंत्र्याची कल्पना देशात आली. हिंदूंची दैन्यवस्था करण्याचे काम हिंदूंनीच केले आहे. म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदू समाजाचे संघटन करण्याचे ठरवले.घराणे शाही मोडून काढण्याचे काम संघाने केले आहे. कर्तृत्ववान कार्यकर्ते संघात निर्माण झाले आणि ते संघाने समाजासाठी दिले. फक्त देशभक्त या देशाचे प्रश्न सोडवू शकतील आणि देशभक्त फक्त संघातच घडू शकतो. संघात व्यक्तीला नाही तर विचारांना महत्त्व आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारणी सदस्य हेमंत हरहरे यांनी व्यक्त केले.
सकल हिंदू समाज मानाजी नगर नऱ्हे परिसर तर्फे विराट हिंदू संमेलनाचे आयोजन प्रा. डॉ. सुधाकर राव जाधवर कॅम्पस येथे करण्यात आले होते. यावेळी ह.भ.प. राजेंद्र येप्रे महाराज, सेवा भारती वैभव श्री आयाम प्रमुख पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या रेखाताई सोनुने, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे उपाध्यक्ष ऍड. शार्दूल जाधवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमात भारुड सादरीकरण करण्यात आले.
राजेंद्र येप्रे म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समजून घ्यायचा असेल तर संस्थापक हेडगेवार यांना समजून घेणे गरजेचे आहे. या संमेलनाचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश हा हिंदूंना संघटित करणे आहे. हिंदूंना संघटित करणे म्हणजे वाळूतून तेल काढण्यासारखे आहे. ज्या ठिकाणी धर्म आहे त्या ठिकाणी ज्ञान विज्ञान आणि शांती आहे.

