मुंबई-नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात आता लेखिका अरुणा सबाने यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून महिलांनाही दोषी धरून कारवाई करण्याची मागणी केली आहे. नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या या प्रकरणात अशोक खरात नावाचा व्यक्ती स्वतःला ज्योतिषी म्हणवत महिलांना आपल्या जाळ्यात ओढत असल्याचा आरोप आहे. गोड बोलून, कधी धमकी देऊन तो महिलांना आपल्या कार्यालयात बोलावत असे. तेथे त्यांना पेढा आणि कडवट चवीचे पेय देऊन त्यांच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. एवढंच नव्हे तर या सर्व घटनांचे चित्रीकरणही केल्याचे तपासात समोर आले आहे.
एका महिलेच्या तक्रारीनंतर 17 मार्च रोजी पोलिसांनी खरातला अटक केली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडून सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणात लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांनी नवा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून, ज्या महिला स्वेच्छेने खरातकडे गेल्या त्यांना ‘पीडित’ न म्हणता दोषी मानून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
डॉ. अरुणा सबाने यांनी पत्रात काय लिहिलं?
भोंदूबाबा खरात ने जो पराक्रम गाजवला तो आता बऱ्यापैकी जगासमोर आलेला आहे. अद्यापही जगासमोर न आलेला इतिहास नक्कीच खूप मोठा असेल. तो पोलिसांच्या कस्टडीत आहे. त्याचा कसून तपास सुरू आहे, अशा बातम्या आपण वाचल्या. त्याच्या नादी लागलेल्या स्त्रिया फार मोठ्या प्रमाणात आहेत. त्या सुशिक्षित, श्रीमंत वर्गातल्या, राजकारणातल्या, प्रशासनातल्या, गर्भ श्रीमंत पुरुषांच्या बायका अशा सगळ्या कॅटेगरीतल्या आहेत. अनेक पुरुष त्याच्या ध्यानी लागलेले आहेत. यांना कोणी गळ घालून तिथे नेले किंवा यांच्यावर कोणी बळजबरी केली अशा अवस्थेत त्या कोणत्याच व्हिडिओमध्ये किंवा फोटोमध्ये दिसत नाहीत. याचा अर्थ या स्त्रिया स्वेच्छेने खरातपर्यंत पोचल्या. किंवा खरातने त्यांना भुरळ पाडली आणि त्या तिथपर्यंत पोहोचल्या. सुशिक्षित स्त्रिया सुद्धा या अशा कर्मकांडाला कशा काय भुलू शकतात हे आजच्या तांत्रिक युगामधलं फार मोठं आश्चर्य आहे. मंत्र, जप याच्यापलीकडे जाऊन त्याचे मूत्र पिऊन त्यांच्या आयुष्यात काही बदल घडतो असं या स्त्रियांना वाटणं हे जगातलं नववं आश्चर्य आहे. मुल हे केवळ स्त्री आणि पुरुष संबंधातूनच निर्माण होऊ शकतं .कुठल्याही आशीर्वादातून, राखेतून, गंडे, धागेदोरे यातून होऊच शकत नाही इतकी साधी अक्कल या शिकलेल्या बायांना अजूनही का येत नाही याचे आश्चर्य वाटते. आणि भोंदू बाबा तुमच्याशी शरीर संबंध ठेवून तुम्हाला मूल देऊ इच्छित असेल तर हा प्रसाद नसून सरळ सरळ बलात्कार आहे हे या स्त्रियांच्या का लक्षात येत नाही?
योनीपूजा किंवा योनीला शूचिर्भूत करणे वगैरे हाही एक प्रकार वाचला. स्त्रीची योनी (Vagina) कुणीही शुद्ध वगैरे करू शकत नाही. तिला शुद्ध, स्वच्छ करणे ही आपली स्वतःची जबाबदारी आहे. योनी शुद्धीकरण ही वैज्ञानिक नव्हे, धार्मिक संकल्पना आहे, हे माहिती नसण्याइतपत स्त्रिया मूर्ख असतील तर यांनाही कडक शिक्षा झालीच पाहिजे.
चाकणकरांना कायद्याने शिक्षा व्हायला पाहिजे
रूपाली चाकणकर सारखी बाई स्वतः त्या भोंदूच्या अधीन होतेच बरोबर इतरही स्त्रियांना त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करते. ही बातमी उघड करणाऱ्या पत्रकाराला धमकावते पोलीस यंत्रणेवर दबाव आणण्यासाठी स्वतःच्या महिला आयोग अध्यक्ष पदाचा वापर करते. अशा स्त्रीला तर जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हायलाच पाहिजे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवणे ही काही शिक्षा नाही. तिला कायद्याने शिक्षा व्हायला पाहिजे आणि अशा ज्या ज्या स्त्रिया आहेत; ज्या स्त्रिया या सर्व प्रकाराला खतपाणी घालणाऱ्या आहेत यात काही शंका नाही. त्यामुळे खरातला तर फाशीची शिक्षा व्हावीच पण त्यासोबतच त्याच्या नादी लागून समाजामध्ये ही जी गैरसमजाची फार मोठ्या प्रमाणात पेरणी केलेली आहे यांनाही कडक शासन व्हायलाच हवे. खरात काय किंवा चाकणकर काय ही एक प्रवृत्ती आहे. तिला वेळीच ठेचले पाहिजे.
स्त्रिया इतक्या मूर्ख कशा काय असू शकतात?
आजच्या काळातल्या स्त्रिया इतक्या मूर्ख कशा काय असू शकतात हे जगातले नववे आश्चर्य आहे. यांना अशा सर्व गोष्टींसाठी जर आपण जबाबदार धरले नाही तर ही वृत्ती वाढत जाणार आहे. या अंधश्रद्धांना कुठेतरी आळा घालणं गरजेचे आहे. या सगळ्या प्रकारात खूप घाणेरडे राजकारण आहे, याची मला जाणीव आहे. तरीही जे समाजाच्या समोर आले ते भयानक आहे. त्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे केवळ खरात तर दोषी आहेच यात काहीही शंका नाही. त्याला तर फाशीचीच शिक्षा व्हायला हवी, आमची मागणी आहे. पण त्याच्या नादी लागणाऱ्या बायाही तेवढ्याच दोषी आहेत हे मी परत परत म्हणेन. म्हणून त्यांनाही कडक शासन व्हायलाच हवे. जेणेकरून यानंतर अशा भोंदू बाबांच्या आहारी स्त्रिया जाताना दहादा विचार करतील. हीही माझी मागणी आहे.

