पुढारी असतील किंवा अधिकारी ज्यांचा – ज्यांचा या प्रकरणात समावेश असेल, त्या सर्वांवर कारवाई केली जाणार
मुंबई-भोंदू अशोक खरात हे प्रकरण केवळ बलात्कार किंवा फसवणुकीपुरते मर्यादित नाही. या प्रकरणात काही लोकांनी जीव दिल्याचाही प्रकार समोर येत आहे, असा दावा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यांच्या या माहितीमुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अशोक खरातला तब्बल 17 वेळा फोन केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे राज्यात एकच खळबळ माजली आहे. पत्रकारांनी याविषयी मंत्री संजय शिरसाट यांना छेडले असता त्यांनी थोडी कळ काढा या प्रकरणी सर्व पर्दाफाश होईल असे स्पष्ट केले. ते म्हणाले, भोंदू अशोक खरात प्रकरणाचा तपास पोलिस यंत्रणा करत आहे. एका महिला अधिकाऱ्याने हे सर्व प्रकरण उजेडात आणले आहे. त्याची चौकशी अत्यंत योग्य पद्धतीने सुरू आहे.
हा भोंदू बाबा एका प्रकरणात अडकलेला नाही, तर अनेक प्रकरणांत अडकलेला नाही. बलात्कार व मनी लाँड्रिंगच नाही, तर आणखी काही प्रकरणे पुढे येत आहेत. काही लोकांनी जीव देण्याचेही प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे मी सर्वांना विनंती करत आहे की, त्याला राजकारणाकडे वळण देऊ नका. हे सर्व पाहता आपण खरातला वाचवतो की काय? असे वाटते.संजय शिरसाट म्हणाले, प्रस्तुत प्रकरणात अशोक खरात राहिला बाजूला आणि इतरांवरच आरोप प्रत्यारोप होत आहेत. जे काही चौकशीत समोर येईल, मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या, कोणताही नेता असू द्या. सरकार त्याच्यावर कारवाई करेल. त्याची कुणीही चिंता करू नये. सध्या रोज एकच विषय चालू आहे खरात व त्याच्याशी संबंधित असणाऱ्या पुढाऱ्यांचा. पुढारी असतील किंवा अधिकारी ज्यांचा – ज्यांचा या प्रकरणात समावेश असेल, त्या सर्वांवर कारवाई केली जाणार आहे. या प्रकरणात हात असलेल्या लोकांवर 100 टक्के गुन्हा दाखल केला जाईल हे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे आपण प्रतिक्षा केली पाहिजे.
कशाचे फोन होते, काय होते हे पाहावे लागेल. माझेही फोटो आहेत. याचा अर्थ मी गुन्हेगार असेल तर मी सुद्धा जेलमध्ये गेले पाहिजे. मी कुणालाही स्पेअर करा असे म्हणत नाही. पण खरातने ज्या पद्धतीचे गुन्हे गेलेत, ते महाराष्ट्राच्या इतिसात असे करणारा तो पहिला गुन्हेगार असावा. त्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई व्हावी ही सर्वसामान्य लोकांसह आमचीही इच्छा आहे. थोडी कळ काढा सर्व पर्दाफाश येईल, असे शिरसाट म्हणाले.

