नवी दिल्ली, 3 एप्रिल 2026
‘प्रकल्प 17-ए’ श्रेणीतील चौथी शक्तिशाली युद्धनौका असलेली ‘आयएनएस तारागिरी’, आज 3 एप्रिल, 2026 रोजी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली. आधुनिक युध्दनौकाबांधणी क्षेत्रातील एक उत्कृष्ट नमुना असलेली ही अद्ययावत स्टेल्थ फ्रिगेटचे वजन अंदाजे 6,670 टन आहे. या युद्धनौकेची रचना ‘वॉरशिप डिझाइन ब्युरो’ने केली असून, ‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड’ने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सहकार्याने तिची बांधणी केली आहे. शत्रूच्या रडारवर सहजपणे दृष्टीस पडू शकणार नाही, अशा (कमी ‘रडार सिग्नेचर’ राखण्यासाठी) अतिप्रगत ‘स्टेल्थ तंत्रज्ञाना’चा वापर या युध्दनौकेच्या बांधणीसाठी करण्यात आला आहे. यामुळे संघर्षप्रवण वातावरणात या युद्धनौकेकडे शत्रूवर वर्चस्व गाजवण्याची क्षमता आहे.

‘तारागिरी’ ची बांधणी करताना 75 टक्क्यांहून अधिक स्वदेशी घटकांचा वापर केला असून, अत्यंत कमी कालावधीत तिची बांधण्यात आली आहे. ‘तारागिरी’ ही युद्धनौका, भारताचे नौकाबांधणी क्षेत्रातील नैपुण्य आणि सार्वजनिक-खाजगी क्षेत्रांमधील भक्कम सहकार्याचे उत्तम उदाहरण आहे. आपल्या भाषणात संरक्षणमंत्र्यांनी ‘आयएनएस तारागिरी’चे वर्णन केवळ एक युद्धनौका म्हणून न करता, भारताची वाढती तांत्रिक क्षमता, आत्मनिर्भरता आणि नौदलाच्या अदम्य सामर्थ्याचे प्रतीक असे केले.

“ही युद्धनौका अत्यंत वेगाने प्रवास करण्यास सक्षम असून, दीर्घकाळापर्यंत समुद्रात तैनात राहू शकते. शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, स्वतःच्या सुरक्षेची खात्री करणे आणि गरज भासल्यास त्वरित प्रत्युत्तर देणे, या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या प्रणालींनी ही युद्धनौका सुसज्ज आहे. यात आधुनिक रडार, सोनार आणि ‘ब्रह्मोस’ सारखी ‘पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी’ क्षेपणास्त्रे यांसारख्या अद्ययावत क्षेपणास्त्र प्रणालींचा समावेश आहे. या सर्व आधुनिक साधनांमुळे ‘तारागिरी’ची क्षमता आणखी वाढली आहे. तीव्र स्वरूपाच्या लढायांपासून ते सागरी सुरक्षा, चाचेगिरीविरोधी मोहिमा, किनारपट्टीवर देखरेख ठेवणे आणि मानवतावादी मोहिमांपर्यंत—प्रत्येक भूमिकेत ही युद्धनौका अगदी चपखलपणे सामावून जावू शकणार आहे, त्यामुळे ‘तारागिरी’ एक अद्वितीय नौदल मंच ठरते,” असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नमूद केले.

सुमारे अकरा हजार किलोमीटरहून अधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेल्या आणि तीनही बाजूंनी समुद्राने वेढलेल्या भारताचा विकास, समुद्राला वेगळे ठेवून पाहता येणार नाही; यावर संरक्षणमंत्र्यांनी भर देऊन, पुढे नमूद केले की, देशाचा सुमारे 95 टक्के व्यापार सागरी मार्गांद्वारे चालतो आणि देशाची ऊर्जा सुरक्षा समुद्रावर अवलंबून आहे. यामुळेच एक सामर्थ्यवान आणि सक्षम नौदल उभारणे ही केवळ एक निवड अथवा पर्याय राहिलेले नाही तर, ती एक नितांत आवश्यकता बनली आहे.
बदलत्या सुरक्षा परिस्थितीमध्ये सागरी क्षेत्राला असलेल्या अपार महत्त्वावर प्रकाश टाकताना, राजनाथ सिंह यांनी सांगितले की, जागतिक स्तरावरील अनिश्चिततेच्या काळात भारतीय नौदल संपूर्ण हिंदी महासागर क्षेत्रात अहोरात्र आपली उपस्थिती कायम राखून असते. ” या विशाल महासागरात अनेक संवेदनशील ठिकाणे आहेत. यामध्ये मालाची वाहतूक सुरळीतपणे सुरू राहावी, हे सुनिश्चित करण्यासाठी आमचे नौदल सातत्याने आपली सक्रिय उपस्थिती राखून असते. ज्यावेळी तणाव निर्माण होतो, त्यावेळी व्यापारी जहाजे आणि तेलवाहू टँकर्स यांना सुरक्षेची हमी देण्यासाठी भारतीय नौदल तत्परतेने पुढे सरसावते.”भारताचे नौदल आपल्या राष्ट्रीय हितसंबंधांचे रक्षण करण्यासोबतच, जगभरातील आपले नागरिक आणि व्यापार मार्गांच्या सुरक्षेसाठी गरजेचे असलेले प्रत्येक पाऊल उचलण्यासाठी सज्ज असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. नौदलाच्या याच क्षमतेने भारताला एक उत्तरदायी आणि सामर्थ्यवान सागरी शक्ती म्हणून भक्कम स्थान मिळवून दिले असल्याचे ते म्हणाले.

आजच्या आधुनिक डिजिटल युगात जगातील बहुतांश माहितीसाठ्याची देवाणघेवाण ही समुद्राखालील इंटरनेट केबल्सच्या माध्यमातून होत असते. त्यांना कोणतेही नुकसान झाले तर जागतिक व्यवस्थेला बाधा निर्माण होऊ शकते असे ते म्हणाले. त्यामुळेच सागरी सुरक्षेकडे केवळ पारंपारिक दृष्टिकोनातून न पाहता, त्याकडे एक सर्वसमावेशक आणि भविष्यासाठीची सज्जता अशा दृष्टीकोनातून पाहायला हवे असे आवाहन त्यांनी केले. आपण केवळ आपल्या किनारपट्टी प्रदेशांचे रक्षण करण्यापुरते मर्यादित राहून चालणार नाही, तर आपल्या राष्ट्रीय हितसंबंधांशी अविभाज्यपणे जोडले असलेले महत्त्वाचे समुद्री मार्ग, मोक्याची ठिकाणे आणि डिजिटल पायाभूत सुविधांच्या सुरक्षेची सुनिश्चितीही आपण केली पाहिजे असं ते म्हणाले. यासंबंधीच्या सर्व सुरक्षा विषयक प्रयत्नांमध्ये भारतीय नौदल सक्रियपणे सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले. अशा दृष्टिकोनामुळेच आपण भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज होत असतो असे त्यांनी सांगितले. जेव्हा जेव्हा भारत आयएनएस तारागिरी सारखी प्रगत जहाजे तयार करतो आणि तैनात करतो, तेव्हा तेव्हा अशी जहाजे संपूर्ण प्रदेशासाठी शांतता आणि समृद्धीची हमी ठरत असतात ही बाब त्यांनी अधोरेखीत केली.
जेव्हा कोणतेही संकट उद्भवते, तेव्हा नागरिकांच्या सुटकेशी संबंधीत मोहीमा असोत, अथवा मानवतावादी मदत असो, भारतीय नौदल सदैव आघाडीवर असते, ते भारताची मूळ गाभ्याशी जोडलेली मूल्ये आणि अटळ वचनबद्धतेचे प्रतिनिधीत्व करत असते असे ते म्हणाले. आयएनएस तारागिरी आपल्या नौदलाचे सामर्थ्य, मूल्ये आणि वचनबद्धता अधिक वृद्धींगत करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
येत्या काळात स्वदेशी उद्योगाच्या पाठबळावर भारतीय नौदलाला, जगातील सर्वात शक्तिशाली नौदलांपैकी एक म्हणून स्थान मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचे संरक्षणमंत्री म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील संरक्षण उत्पादन क्षेत्र, एखाद्या राष्ट्रीय मोहिमेप्रमाणेच पुढे वाटचाल करते आहे. आज आपण केवळ स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यापुरते मर्यादित राहिलेलो नाही, तर जागतिक पुरवठा साखळीतील आपले स्थानही अधिक भक्कम करू लागलो आहोत असे ते म्हणाले. अशा उत्पादनांचे डिझाईन तयार करण्यापासून ते विकसित करण्यासह, ते प्रत्यक्ष तैनात करण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर भारताचा सहभाग अविभाज्य झाला असल्याचे ते म्हणाले. यातूनच आज भारताकडे स्वतःच्या सुरक्षेसोबतच, तर स्वतःच्या भविष्याचे डिझाईन करण्याची क्षमता असल्याचा आत्मविश्वास मिळतो असे ते म्हणाले. आयएनएस तारागिरी हे याच दूरदृष्टीचे मूर्त रूप आहे, असे ते म्हणाले.
गेल्या दशकभरात देशात घडून आलेल्या परिवर्तनाबद्दलही त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने युवा वर्ग आणि उद्योग जगतासाठी, सातत्यपूर्णतेने नवोन्मेष, उत्पादन आणि निर्यातीला प्रोत्साहन देणारी परिसंस्था उभी केली असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याच्या अनिश्चिततेच्या काळात प्रत्येक गोष्टीसाठी सज्ज असावे, याकरता भारताला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही ही बाब त्यांनी अधोरेखीत केली. सुरक्षेच्या अनुषंगाने होत असलेले प्रयत्न केवळ जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्रापुरते मर्यादित असता कामा नयेत , तर त्यासोबतच अंतराळ, सायबर क्षेत्र आणि आर्थिक क्षेत्रांपर्यंत या प्रयत्नांची व्याप्ती विस्तारायला हवी असे ते म्हणाले. याच दृष्टीकोनापासून प्रेरित होऊन केंद्र सरकारने अनेक महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेतले असून, त्यांचे परिणाम आता दिसून येऊ लागल्याचे त्यांनी नमूद केले.
संरक्षणमंत्र्यांनी भारताची सुरक्षा यंत्रणा बळकट करण्याच्या दिशेने माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड आणि इतर संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या सातत्यपूर्ण सकारात्मक योगदानाचे कौतुक केले. त्यांनी 16 संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना संरक्षणातील आत्मनिर्भरतेची केंद्रे असे संबोधले. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये संरक्षण निर्यात 38,424 कोटी रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर नेल्याबद्दल संरक्षणमंत्र्यांनी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील प्रयत्नांची प्रशंसा केली. ते म्हणाले की, 13-14 वर्षांपूर्वी आपण 1,200 कोटी रुपयांच्या संरक्षण साहित्याची निर्यात करत होतो. आज त्यात वाढ होऊन ती जवळपास 39,000 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. भारताची आत्मनिर्भरता सातत्याने वाढत असल्याचा हा पुरावा असून आपण आपल्या पायावर उभे राहत आहोत, याचे हे प्रतीक आहे.

याप्रसंगी बोलताना नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी राष्ट्रीय सागरी हितसंबंधांचे कधीही, कुठेही आणि कोणत्याही परिस्थितीत संरक्षण करण्यासाठी भारतीय नौदल सदैव युद्धसज्ज, विश्वासार्ह, सुसंगत आणि भविष्यवेधी दल म्हणून राहण्यासाठी वचनबद्ध असल्याचे अधोरेखित केले.
आयएनएस तारागिरी विषयी :
ही युद्धनौका जुन्या संरचनेच्या तुलनेत मोठी झेप असून, तिचे स्वरूप अधिक डौलदार आणि रडार क्रॉस – सेक्शन लक्षणीयरीत्या कमी आहे. यामुळे ही नौका शत्रूच्या नजरेत न येता अत्यंत घातकपणे आणि गुप्तपणे कामगिरी करण्यास सक्षम आहे. 75 टक्क्याहून अधिक स्वदेशी बनावटीचे साहित्य असलेली ही युद्धनौका देशांतर्गत औद्योगिक परिसंस्थेच्या परिपक्वतेचे दर्शन घडवते. यामध्ये 200 हून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा समावेश असून, यामुळे सरकारच्या ‘आत्मनिर्भरता’ उपक्रमाला चालना मिळण्यासोबतच हजारो भारतीयांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

या जहाजाची लढाऊ क्षमता जागतिक दर्जाची असून, यामध्ये पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारी सुपरसॉनिक क्षेपणास्त्रे, मध्यम पल्ल्याची पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि प्रगत स्वदेशी पाणबुडीविरोधी यंत्रणेचा समावेश आहे.


