पुणे :पेट्रोल आणि एलपीजी गॅसच्या दरवाढीनंतर आता सीएनजीचे दर वाढले आहेत. पुण्यामध्ये सीएनजीचे नवे भाव स्पष्ट झाले आहेत.पुण्यामध्ये सीएनजीचे दर दोन रुपयांनी वाढले असून 94.50 रुपये प्रति किलो, असे नवीन दर असतील. शुक्रवारी रात्री बारा वाजल्यापासून नवीन दर लागू होणार आहेत. 92.50 रुपये प्रति किलो मिळणारा सीएनजी आता २ रुपयांनी महाग खरेदी करावा लागणार आहे.
दरम्यान, बुधवार, दि. १ एप्रिलरोजी ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन’ने आपल्या ‘प्रीमियम’ इंधनांच्या किमती वाढवल्या आहेत. कंपनीने ‘१००-ऑक्टेन’ पेट्रोलचे दर वाढवले आहेत; हे पेट्रोल ‘XP100′ या नावाने बाजारात उपलब्ध आहे. दिल्लीमध्ये, या पेट्रोलचा दर प्रति लिटर ₹१४९ वरून वाढवून १६० रुपये करण्यात आला आहे. तसेच’एक्स्ट्रा ग्रीन’ ही प्रीमियम श्रेणीतील डिझेल देखील महाग झाले आहे. याचा दर प्रति लिटर ₹९१.४९ वरून वाढून ९२.९९ रुपये इतका झाला झाला आहे. हे नवीन दर IOCL च्या सर्व विक्री केंद्रांवर लागू करण्यात आले आहेत.
मागील आठवड्यात केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरांबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारने पेट्रोलवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क कमी करून ते प्रति लिटर ३ रुपये इतके केले आहे, तर डिझेलवरील हे शुल्क पूर्णपणे रद्द करण्यात आले आहे. यापूर्वी, पेट्रोलवर प्रति लिटर १३ आणि डिझेलवर प्रति लिटर १० रुपये इतके विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क आकारले जात होते.
पश्चिम आशियातील सध्याचा तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली प्रचंड वाढ यामुळे भारतासारख्या आयातीवर अवलंबून असलेल्या देशांवरील दबाव अधिकच वाढला आहे. या पार्श्वभूमीवर, करांमध्ये कपात करून सामान्य जनतेला दिलासा देण्याचा आणि महागाई नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. पण तज्ञांचे असे म्हणणे आहे की, जर जागतिक कच्च्या तेलाच्या किमती उच्च पातळीवरच राहिल्या, तर भविष्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पुन्हा एकदा वाढू शकतात.

