मुंबई-
मुंबईतून कोकणात जाणारी ट्रेन रत्नागिरी-दिवा पॅसेंजर ट्रेन ही पूर्वीप्रमाणेच दादर स्थानकापर्यंत चालवण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली होती. ही मागणी रेल्वे खात्याने फेटाळून लावली असल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हे तर भविष्यात कोकणात जाणाऱ्या सर्व एक्सप्रेस ट्रेनचा मार्गही बदलण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
कोरोनाच्या काळात रत्नागिरी-दादर ही पॅसेंजर ट्रेन बंद करण्यात आली होती. ही ट्रेन आता फक्त दिवा स्थानकापर्यंतच येते आणि येथूनच सुटते. त्यामुळे मुंबईतील प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ही ट्रेन पुन्हा दादरपर्यंत सुरू करण्यात यावी अशी मागणी मनसेने केली होती. त्यानुसार शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांनी बुधवारी दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत कोकणातील पदाधिकारीही होते.
खासदार रवींद्र वायकर यांनी अश्विनी वैष्णव यांच्याकडे रत्नागिरी ते दादा किंवा सीएसएमटी अशीह ट्रेन सुरू करण्याच्या मागणीचे पत्र दिले. यावर मंत्री वैष्णव यांनी अशी सेवा सुरू करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे रत्नागिरी-दिवा पॅसेंजर ट्रेन आता दादर स्थानकपर्यंत येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतल्यानंतर खासदार रवींद्र वायकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, सध्याची रत्नागिरी-दिवा पॅसेंजर ट्रेन ही आता पश्चिम रेल्वेमार्गावरून वसईला जाईल. पुढे वसईवरून पनवेलमार्गे ही ट्रेन कोकणात जाईल. आता दादर-रत्नागिरी ट्रेन सुरू करणे शक्य नाही. दीड ते दोन वर्षात नव्या रेल्वेमार्गाचे काम पूर्ण होईल. त्यानंतर कोकणात जाणाऱ्या सर्व एक्सप्रेस ट्रेन या नव्या मार्गानेच जातील. पुढील एक-दीड वर्षात हे काम पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आपल्याला नवीन मार्ग मिळणार आहे. त्यामुळे आता यामध्ये राजकारण आणू नये, असे आवाहनही वायकर यांनी यावेळी केले आहे.

