लेफ्टनंट जनरल संदीप जैन(AVSM),(SM) यांनी 1 एप्रिल 2026 रोजी दक्षिण कमांडचे ‘जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून सूत्रे हाती घेतली. त्यांनी लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची जागा घेतली असून, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी आजच ‘उप-लष्कर प्रमुख’ म्हणून पदभार स्वीकारला आहे.राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असलेले लेफ्टनंट जनरल संदीप जैन, जून 1988 मध्ये ‘महार रेजिमेंट’मध्ये नियुक्त झाले. जवळपास चार दशकांच्या प्रदीर्घ आणि गौरवशाली कारकिर्दीत, त्यांनी विविध ठिकाणी आणि वेगवेगळ्या अधिकारपदांवर महत्वाची कामगिरी बजावली आहे.
जैन यांनी निम-विकसित भूप्रदेशासह, दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्र मिशनमध्ये एका सैनिकांच्या तुकडीचे, स्ट्राइक कोअरमधील एका पायदळ ब्रिगेडचे, दहशतवादविरोधी दलाचे आणि उत्तर कमांडमधील एका महत्त्वाच्या कोअरचे नेतृत्व केले आहे.
ऑपरेशन पवन मधील सहभाग, इथिओपियामधील संयुक्त राष्ट्र मिशनमध्ये लष्करी निरीक्षक म्हणून केलेली सेवा आणि नियंत्रण रेषेसह ईशान्य भारतामध्ये उंचीवरील क्षेत्रात आणि दहशतवादविरोधी कारवायांमध्ये बजावलेल्या अनेक मोहिमांचा त्यांना अनुभव आहे. ते महार रेजिमेंटचे कर्नल म्हणूनही कार्यरत आहेत.
दक्षिण कमांडचे नेतृत्व स्वीकारण्यापूर्वी त्यांनी मुख्यालय दक्षिण कमांड येथे चीफ ऑफ स्टाफ म्हणून काम पाहिले होते. या पदावर असताना त्यांनी लष्करी क्षमतावृद्धी, दलाची पुनर्रचना आणि एकूणच कार्यसज्जता वाढविण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
त्यांनी आर्मी वॉर कॉलेज येथून उच्च कमांड अभ्यासक्रम, तसेच केनियाच्या नॅशनल डिफेन्स कॉलेजमधून नॅशनल डिफेन्स कोर्स पूर्ण केला आहे. त्यांच्या उल्लेखनीय आणि उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना अतिविशिष्ट सेवा पदक(AVSM) आणि सेना पदक(SM) प्रदान करण्यात आले आहे.
कमांडची सूत्रे स्वीकारल्यानंतर लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांनी युद्धात हौतात्म्य पत्करणाऱ्या सैनिकांना दक्षिण कमांडच्या युद्ध स्मारकावर आदरांजली अर्पण केली आणि मुख्यालय दक्षिण कमांड येथे गार्ड ऑफ ऑनर स्वीकारला.वाळवंट क्षेत्र, रण व खाडी प्रदेश, किनारपट्टी, बेटे तसेच अंतर्गत भाग अशा विविध कार्यक्षेत्रांमध्ये परिचालनात्मक सज्जतेवर कमांडचा सातत्याने भर राहील, असे ते म्हणाले.
तसेच त्यांनी ‘JAI’ या चौकटीअंतर्गत संयुक्त कार्यपद्धती (jointness) अधिक मजबूत करणे, स्वदेशी क्षमताविकास आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यावर विशेष भर देण्याचे सांगितले. बदलत्या कार्यात्मक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर सर्व स्तरांवरील अधिकाऱ्यांनी व जवानांनी उच्च दर्जाची सज्जता, व्यावसायिकता आणि लढाऊ तत्परता कायम राखावी, असेही त्यांनी निर्देश दिले.

