मुंबई-डोंबिवलीचा कुख्यात गुंड आणि सोशल मीडियावर रील स्टार म्हणून प्रसिद्ध असलेला 55 वर्षीय सुरेंद्र पांडुरंग पाटील हा जामिनावर बाहेर येऊन दोन आठवडे पूर्ण होण्यापूर्वीच पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. ठाणे गुन्हे शाखेने शनिवारी मध्यरात्री केलेल्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली असून, जामिनावर मुक्त होताच पुन्हा बेकायदा कृत्यांत गुंतलेल्या या हिस्ट्रीशीटरचा खरा चेहरा आता समोर आला आहे.
ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे दावडी येथील सुरेंद्रच्या आलिशान बंगल्यावर छापा टाकला असता, झडतीदरम्यान पोलिसांना घराच्या इंटिरिअरशी विसंगत असलेल्या एका शू-रॅक बद्दल संशय आला. पोलिसांनी या कपाटाची कसून तपासणी केली असता, त्यातील एका अत्यंत शिताफीने बनवलेल्या गुप्त कप्प्यात दडवून ठेवलेला शस्त्रास्त्रांचा मोठा साठा उघड झाला. घरात एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रे सापडल्याने स्वतः पोलिसही चक्रावून गेले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईत पोलिसांनी सुमारे 10 लाख रुपये किमतीचा शस्त्रसाठा जप्त केला असून, यात 7 बंदुका, जिवंत काडतुसे आणि 167 एअर गनच्या गोळ्यांचा समावेश आहे. जप्त केलेल्या शस्त्रांमध्ये पाच देशी बनावटीची पिस्तूलं व रिव्हॉल्व्हर आणि दोन एअर गन असून, काही पिस्तुलांवर ‘Made in USA’ आणि ‘स्पेशल ऑटो’ असे कोरलेले आढळले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर सापडलेली जिवंत काडतुसे पाहता, हा साठा केवळ प्रदर्शनासाठी नसून तो प्रत्यक्ष गुन्हेगारी वापरासाठी सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली आहे.
सोशल मीडियावर 3 लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेला आणि सातत्याने ‘भाईगिरी’ची रिल्स पोस्ट करणारा सुरेंद्र पाटील आता हा शस्त्रसाठा केवळ चित्रीकरणासाठी असल्याचा दावा करत आहे. मात्र, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता पोलिस त्याच्या या दाव्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. हा शस्त्रास्त्रांचा मोठा साठा स्थानिक गुन्हेगारांना पुरवण्यासाठी किंवा इतर कोणत्या गंभीर गुन्ह्यासाठी जमवला होता का, या दिशेने आता पोलिस सखोल तपास करत आहेत.

