पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे भरारी पथकाने आंतर जिल्हा मद्य तस्करी करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल २० लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये छापेमारी करून तस्करीचे संपूर्ण जाळे उद्ध्वस्त करण्यात अधिकाऱ्यांना यश आले आहे.
प्रेम सोमनाथ भडवलकर (रा. बारामती) आणि अक्षय अधिकराव देशमुख (रा. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही टोळी गोव्यातील स्वस्त दरातील मद्य मोठ्या प्लास्टिक ड्रममध्ये भरून महाराष्ट्रात आणत होती. त्यानंतर या मद्याला नामांकित ब्रँडच्या बाटल्यांमध्ये भरून बाजारात चढ्या दराने विक्री केली जात होती. या प्रकारामुळे शासनाला महसुलाचे मोठे नुकसान होत होते, तसेच ग्राहकांची फसवणूकही केली जात होती.उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला कांदलगाव (ता. इंदापूर) परिसरात मोठ्या प्रमाणात मद्य तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार २७ मार्च रोजी दुपारी सापळा रचण्यात आला. कांदलगाव–शहा रस्त्यावर संशयित मालवाहू वाहन अडवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. काही अंतरापर्यंत पाठलाग करून अधिकाऱ्यांनी वाहन थांबवले. झडतीदरम्यान वाहनातून मद्याने भरलेले २५ प्लास्टिक ड्रम आणि ‘रॉयल स्टॅग’ व्हिस्कीच्या बाटल्यांसाठी वापरली जाणारी सुमारे १,४०० बनावट बुचे जप्त करण्यात आली.
माढा, साताऱ्यात छापा, विदेशी मद्याचा साठा जप्त…
आरोपींना अटक केल्यानंतर चौकशीत मद्य तस्करीचे जाळे अनेक जिल्ह्यांत पसरल्याचे उघड झाले. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे आरोपी अक्षय देशमुख यांच्या घरावर छापा टाकला. या कारवाईत गोव्यातून आणलेल्या विदेशी मद्याच्या बाटल्या, रिकाम्या बाटल्या आणि सुमारे दोन हजार बनावट बुचे असा सुमारे ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील महिमानगड येथे फरार आरोपीच्या घरावर छापा टाकण्यात आला. या ठिकाणाहून ‘इम्पेरियल ब्ल्यू’ व्हिस्कीच्या बाटल्या तसेच मोठ्या प्रमाणात बनावट बुचे जप्त करण्यात आली.

