पुणे : ‘त्रिशला नंदन वीर की…. जय बोलो महावीर की, जय बोलो महावीर की’, ‘प्रेम से बोलो जय महावीर’ असा जयघोष करीत श्री जैन सामुदायिक उत्सव समितीच्या वतीने आज (दि. ३१) तीर्थंकर भगवान महावीर स्वामीजी यांच्या २६२५व्या जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त भगवान महावीर यांना अभिवादन करण्यात आले. मंगलवाद्यांच्या सुरात तीर्थंकर भगवान महावीर स्वामीजी यांच्या भव्य प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली.

श्री जैन सामुदायिक उत्सव समिती, पुणेच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेस श्री जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघ, श्री वर्धमान श्र्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघ, श्री जैन श्र्वेतांबर तेरापंथी सभा, श्री दिगंबर जैन समाज आणि स्थानिक संस्थांचे विशेष सहकार्य लाभले.
श्री जैन सामुदायिक उत्सव समिती, पुणेचे अध्यक्ष अचल जैन, कार्याध्यक्ष प्रकाश धारीवाल, महावीर कटारिया, सुधीर शहा, सचिव अनिल गेलडा, संपत जैन, कोषाध्यक्ष समीर जैन, सह कोषाध्यक्ष अल्पेश गोगरी, प्रचार प्रमुख नितीन जैन, सल्लागार सुनिल कटारिया, हरेश शहा, विजयकांत कोठारी, सुधीर शहा, अल्पेश गोगरी, भरत सुराणा, जिनेंद्र कावेडिया, विनोद सोलंकी, संजय ओस्तवाल, प्रमोद छाजेड, अनिल नहार, प्रविण सोलंकी, सत्यजीत शहा यांच्या मार्गदर्शनाखाली शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी ७.३० वाजता गुरुवार पेठेतील श्री गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिर येथून भगवान महावीर यांचा जयघोष करीत शोभायात्रेला सुरुवात झाली. आकर्षक फुलांच्या सजावटीने शोभायात्रेतील रथ सजविण्यात आले होते. शोभायात्रेच्या सुरुवातीस भगवान महावीर यांची प्रतिमा असलेला चांदीचा रथ होता. शोभा यात्रेत पुण्यातील जैन मंदिरांचे एकूण २० रथ शोभायात्रेत सहभागी झाले होते. शोभायात्रेत भगवान महावीर यांच्या जीवनावर आधारित विविध आकर्षक देखावे मांडण्यात आले होते. भगवान महावीर यांनी दर्शविलेली जीवनसूत्रे, सिद्धांत जीवंत देखाव्यांद्वारे सादर करण्यात आले. श्री क्षत्रिय घाँची समाज ट्रस्टच्या सदस्यांनी पारंपरिक वाद्यांच्या तालावर फेर धरत भगवान महावीर यांच्या नावाचा जयघोष केला. आत्मसंरक्षणाचे धडे देणारे लाठ्या-काठ्या, दाणपट्टा याची प्रात्यक्षिके लहान मुलांनी सादर केली. या शोभायात्रेत पारंपरिक सनई-चौघड्याचे वादन तसेच ढोलताशा पथकांचाही सहभाग होता.
जैन बंधू-भगिनी पारंपरिक वेषभूषेत मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभागी झाले होते. युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.
शोभायात्रा भांडी आळी, लालबहादूर शास्त्री चौक, बोहरी आळी, सोन्या मारुती मंदिर चौक, गणेश पेठ, गोविंद हवालई चौक, बुरडी पूल, पालखी विठोबा चौक, श्री शंखेश्वर पार्श्वनाथ मंदिर, रामोशी गेट, टिंबर मार्केट, मनमोहन पार्श्वनाथ मंदिर, सेव्हन लव्हज् चौक, अप्सरा चौक, प्रभात प्रेस, कटारिया हायस्कूल, लक्ष्मी विलास, मुकुंदनगर, सुजय गार्डन, शिवशंकर सभागृह, सातारा रोडमार्गे आदिनाथ स्थानक येथे दुपारी पोहोचली. ढोल-ताशाच्या गजरात उत्साहाने आणि भावपूर्णतेने या शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.
सोन्या मारुती चौकात भगवान महावीर आणि शोभायात्रेच्या अग्रभागी असलेले जैन साधू-साध्वींचे दर्शन आमदार हेमंत रासने, रमेश बागवे, प्रवीण चोरबेले, ॲड. अभय छाजेड, अजय खेडेकर यांच्यासह सामाजिक, राजकीय क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी घेतले.
भगवान महावीर स्वामीजी यांच्या जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त दरवर्षी युवकांची दुचाकी रॅली काढण्यात येते. परंतु या वर्षी पेट्रोल टंचाई सदृश्य स्थिती बघता दुचाकी रॅली रद्द करून सामाजिक भान जपल्याचे सांगण्यात आले.

