नवी दिल्ली-
वापरानंतर क्षमता संपलेल्या लिथियम-आयन बॅटऱ्यांपासून मिळवलेल्या स्पेंट ग्रॅफाईटच्या पुनर्वापरासाठी नवे तंत्रज्ञान शोधण्यात आले असून या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बॅटरीपासून निर्माण होणाऱ्या टाकाऊ साहित्याचे इंधन सेलची कार्यक्षमता सुधारणाऱ्या उच्च-मूल्याच्या कार्यकारी साहित्यात रुपांतर करणे शक्य झाले आहे.
लिथियम-आयन बॅटऱ्या आणि इंधन सेल तंत्रज्ञानाच्या वेगवान विकासामुळे बॅटरीपासून निर्माण होणाऱ्या टाकाऊ साहित्याचे व्यवस्थापन तसेच किफायतशीर दरातील, टिकाऊ इंधन सेल उत्प्रेरकांची गरज ही गंभीर आव्हाने बनली आहेत.
इंधन सेल्सच्या महत्त्वाच्या कार्यावरील मर्यादांवर मात करण्यासाठी पुनर्वापर करता येणाऱ्या बॅटरी साहित्याचा उपयोग करता येऊ शकेल का याचा शोध शास्त्रज्ञांतर्फे घेण्यात येत होता आणि आता त्यांनी प्लाटिनम-आधारित ऑक्सिजन रिडक्शन रिअॅक्शन (ओआरआर) इलेक्ट्रोकॅटलिस्ट असलेल्या ग्रॅफाईटवर लक्ष केंद्रित केले आहे.केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या (डीएसटी) अखत्यारीतील स्वायत्त संस्था असलेल्या पावडर मेटॅलर्जी आणि न्यू मटेरियल्स वरील आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रातील (एआरसीआय) संशोधकांनी वापरानंतर क्षमता संपलेल्या लिथियम-आयन बॅटऱ्यांपासून ग्रॅफाईट मिळवले आणि त्याचे पृष्ठभाग क्षेत्र वाढवण्यासाठी तसेच एज कार्यकारी गटांची संख्या वाढवण्यासाठी रासायनिक पद्धतीने त्यावर प्रक्रिया केली.
यापूर्वीच्या अभ्यासांमध्ये केवळ आम्लारीधर्मी माध्यमे अथवा बॅटरीच्या पुनर्वापरावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले होते त्याऐवजी आता या पद्धतीमध्ये पुनर्नवीकरणीय ग्रॅफाईटचा वापर करून आम्लधर्मी माध्यमामध्ये मिथेनॉल-टॉलरंट ओआरआर ची प्रक्रिया केलेली दिसते.
यामुळे लिथियम-आयन बॅटऱ्यांच्या शाश्वत पुनर्वापराला चालना मिळण्यास मदत होईल, महागड्या उत्प्रेरक साहित्यावरील अवलंबित्व कमी होऊन स्वच्छ उर्जा तंत्रज्ञानांचा वापर वाढेल.

