गॅस एजन्सीचा पुरवठा आणि वितरण तात्काळ प्रभावाने बंद ; नियमभंगावर जिल्हा प्रशासनाची कारवाई
पुणे:जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेल्या आदेशानुसार हिंजवडी येथील मे. श्री लक्ष्मी भारतगॅस या गॅस एजन्सीला व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा पुरवठा व वितरण तात्काळ प्रभावाने बंद करण्यात आला आहे.
जिल्हा पुरवठा शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, या एजन्सीकडे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) मार्फत व्यावसायिक एलपीजी सिलेंडर विक्रीचा अधिकृत परवाना आहे. मात्र, दि. २६ मार्च २०२६ रोजी सिलेंडर वितरण करताना शासनाने ठरवून दिलेल्या प्राधान्यक्रमाचे पालन न करता अनधिकृत व नोंदणी नसलेल्या व्यक्तींना सिलेंडर वाटप केल्याचे आढळले. तसेच अधिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने जादा दराने सिलेंडर विक्री केल्याचेही निदर्शनास आले आहे.
या प्रकारामुळे नागरिकांमध्ये एलपीजी पुरवठ्याबाबत गैरसमज निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी तात्काळ कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार संबंधित एजन्सीचा परवाना निलंबित करण्यात येत आहे.
तसेच, या आदेशांची तातडीने अंमलबजावणी करून त्याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) यांना दिले आहेत.

