▪️कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची प्रभावी अंमलबजावणी ठरली ठळक वैशिष्ट्य
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते क्रीडा आयुक्त श्रीमती शीतल तेली-उगले यांचा गौरव
पुणे, दि.२६ – महाराष्ट्र शासनाच्या ‘१५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम’ अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे या कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात सातवा क्रमांक मिळविला आहे. विशेष म्हणजे, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची प्रभावी अंमलबजावणी हे या यशाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले आहे. या उत्कृष्ट कार्याबद्दल आयुक्त श्रीमती शीतल तेली-उगले व त्यांच्या चमूचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
राज्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये ई-गव्हर्नन्स प्रणाली अधिक प्रभावी, पारदर्शक व तंत्रज्ञानाधिष्ठित करण्याच्या उद्देशाने हा १५० दिवसांचा विशेष कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत कार्यालयांचे संकेतस्थळ, ‘आपले सरकार’ प्रणाली, ई-ऑफीस, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉट्सअॅप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ब्लॉकचेन तंत्रज्ञान तसेच भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) या सात घटकांवर आधारित मूल्यमापन करण्यात आले.
दोन टप्प्यांत पार पडलेल्या या मूल्यमापन प्रक्रियेत राज्यातील ६८ आयुक्तालये व संचालनालयांचा समावेश होता. त्यामध्ये क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांनी AI आधारित सेवा सुलभीकरण, डेटा पारदर्शकता वाढविणारे ब्लॉकचेन उपाय आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या जोरावर सातवा क्रमांक मिळवून राज्यस्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली.
या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र प्रदान करून आयुक्त शीतल तेली-उगले व त्यांच्या टीमचा सन्मान करण्यात आला.

