पुणे, : पुणे जिल्ह्यातील बोपदेव घाट परिसरात इफ्तारच्या वेळी मुस्लिम तरुणांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली असून घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, रमजान महिन्यात उपवास सोडण्यासाठी (इफ्तारसाठी) काही मुस्लिम तरुण आस्करवाडी-भिवरी परिसरातील तलावाजवळ जमले होते. सायंकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या अंदाजे १०० जणांच्या जमावाने अचानक हल्ला केल्याचा आरोप आहे.
तक्रारदार फिरोज जावेद सय्यद यांच्या फिर्यादीवरून सासवड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरनुसार, हल्लेखोरांनी तरुणांना धमकावत त्यांच्या डोक्यावरील टोप्या काढण्यास भाग पाडले आणि त्यानंतर काठ्या व धारदार शस्त्रांनी हल्ला केला.
या हल्ल्यात किमान ११ तरुण जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला व चेहऱ्यावर गंभीर दुखापती झाल्या आहेत. सर्व जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.
सासवड पोलीस ठाण्याचे निरीक्षक कुमार कदम यांनी सांगितले की, “या प्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आली असून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या इतर आरोपींचा शोध सुरू आहे.”
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत: गणेश वाल्मीक कटके (२९), गणेश अशोक दळवी (३९), निखील वसंत कटके (२८), सागर नारायण कटके (३५), सुनिल रामदास भोराडे (३६), अजित शांताराम कटके (३३), युवराज बाजीराव कटके (३८) आणि ऋषिकेश संजय कटके (२३). हे सर्व आरोपी भिवरी (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील असून त्यांना २७ मार्च २०२६ रोजी पहाटे १.५५ वाजता अटक करण्यात आली. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
या प्रकरणात अॅडव्होकेट तोसिफ शेख यांनी फिर्यादीच्या वतीने कायदेशीर कामकाज पाहिले. त्यांनी फिर्यादीला योग्य कायदेशीर मार्गदर्शन करत तक्रार नोंदविण्यापासून ते पुरावे सादर करण्यापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांकडे तातडीने कारवाई करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. जखमींना न्याय मिळावा यासाठी पुढील कायदेशीर प्रक्रियेतही ते सक्रियपणे काम करत आहेत.

