पुणे : पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी, मिळकत कर थकबाकीवरील दरमहा २% (वार्षिक २४%) शास्ती कर कमी करून १% करण्याची मागणी नगरसेवक हर्षवर्धन दीपक मानकर यांनी केली आहे. यासंदर्भातील ठराव उद्या होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे.
वाढती महागाई, आर्थिक अडचणी आणि सर्वसामान्य नागरिकांवरील वाढता आर्थिक ताण लक्षात घेता, घरगुती करदात्यांवर सध्याचा उच्च शास्ती कर दर अन्यायकारक ठरत आहे. सध्या घरगुती आणि व्यावसायिक करदात्यांवर समान दराने शास्ती कर आकारला जात असून, याचा सर्वाधिक फटका लहान व मध्यम मिळकतधारकांना बसत आहे.
नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांनी सांगितले की, नव्याने महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या गावांतील नागरिक प्रथमच करप्रणालीत आलेले असून, त्यांना अद्याप करप्रक्रियेची पूर्ण माहिती व मूलभूत सुविधा (रस्ते, पाणी, मलनिस्सारण) पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत त्यांच्यावर २% शास्ती कर लादणे योग्य नाही.
मिळकत कर विभाग हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असून, १९ फेब्रुवारी २०२६ अखेर सुमारे २७१३.६० कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. मात्र, सुमारे ५.४१ लाख मिळकतधारकांकडे अजूनही थकबाकी प्रलंबित आहे. यावरून मोठ्या थकबाकीदारांकडेच मोठ्या प्रमाणात रक्कम अडकून असल्याचे स्पष्ट होते.
महानगरपालिकेच्या अभय योजनेत दंडावर ७५% सवलत दिल्यानंतर ९२४.७० कोटी रुपयांची वसुली झाल्याचे उदाहरण देत, दंड कमी केल्यास करदाते सकारात्मक प्रतिसाद देतात, असेही मानकर यांनी नमूद केले.
तसेच, आतापर्यंत केवळ २३४ मिळकतींवरच जप्ती व सीलिंगची कारवाई करण्यात आली असून, ती अपुरी आहे. मोठ्या थकबाकीदारांवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमुख मागण्या :
• घरगुती करदात्यांसाठी शास्ती कर दर २% वरून १% करावा
• मोठ्या व्यावसायिक थकबाकीदारांवर विशेष वसुली मोहीम राबवावी
• जप्ती, सीलिंग व कायदेशीर कारवाई अधिक प्रभावी करावी
सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी व कर वसुली अधिक न्याय्य आणि परिणामकारक करण्यासाठी हा ठराव मंजूर करावा, अशी मागणी नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांनी केली आहे.
घरगुती करदात्यांसाठी शास्ती कर २% वरून १% करावा:नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांची मागणी
Date:

