मुंबई-पुण्यातील मुंढवा येथील बहुचर्चित जमीन गैरव्यवहार प्रकरणात ‘खारगे समिती’चा अहवाल समोर आल्यानंतर आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. या अहवालात शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असतानाच, आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट पार्थ पवार यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे पवार कुटुंबातील सदस्य पुन्हा एकदा चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खारगे समितीने आपल्या निरीक्षणांमध्ये ‘अमेडिया’ कंपनी आणि त्यातील भागीदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अंजली दमानिया यांनी या मुद्द्याकडे लक्ष वेधताना सांगितले की, अहवालात उल्लेख असलेल्या ‘इतर भागीदार’ या शब्दांत पार्थ पवार यांचा समावेश होतो. शीतल तेजवानी यांनी पार्थ पवार यांना ‘नोटराईज्ड पॉवर ऑफ ॲटर्नी’ दिल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट होत असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. याबाबत त्यांनी यापूर्वीच पत्रकार परिषदेत सविस्तर खुलासा केला होता.
अंजली दमानिया म्हणाल्या की, हे संपूर्ण प्रकरण फौजदारी स्वरूपाचे असल्याचे समितीने आपल्या निरीक्षणात नोंदवले आहे. त्यामुळे खारगे समिती हा अहवाल आता पुढील कार्यवाहीसाठी गृह, उद्योग आणि महसूल विभागाकडे पाठवणार आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या विभागाची जबाबदारी असल्याने, त्यांनी या अहवालातील मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती दमानिया यांनी केली आहे.

