कॉंग्रेसचे “संघटन सृजन अभियान”
राज्यातील वरिष्ठ नेते आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने नेमलेल्या निरीक्षकांकडे जबाबदारी
मुंबई, दि. २४ मार्च २०२६.
काँग्रेस पक्ष संघटना बुथ स्तरापर्यंत मजबूत करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमितीने “संघटन सृजन अभियान” हाती घेतले असून महाराष्ट्रात हे अभियान सुरु करण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी महाराष्ट्रातील सृजन संघटन अभियानासाठी ३७ केंद्रीय निरीक्षक व राज्यातील वरिष्ठ नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे.
ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी मंत्री नसीम खान, अमित देशमुख, यशोमती ठाकूर, आ. डॉ. नितीन राऊत यांच्यासह माजी मंत्री, खासदार, आमदार व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह १८३ सदस्यांचा या यादीत समावेश आहे.पुण्यातील रमेश बागवे,मोहन जोशी,अभय छाजेड, यांचा समावेश आहे तर अनंत गाडगीळ, दीप्ती चौधरी,गोपाळ तिवारी, प्रशांत जगताप यांचा समन्वयक म्हणून समावेश आहे.
या समितीचे सदस्य प्रत्येक जिल्ह्यात जाऊन स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणार आहेत. बूथ स्तर ते राज्य स्तरापर्यंत पक्षाला सशक्त करणे, समर्पित कार्यकर्त्यांना सक्षम करणे, जबाबदाऱ्यांचे पारदर्शकपणे वाटप करणे तसेच महिला व युवकांना पक्ष संघटनेत जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी करून घेणे ही या अभियानाची प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत. या अभियानातून जिल्हाध्यक्षांसह विविध पदांच्या केल्या जाणाऱ्या नियुक्त्या या पारदर्शक पद्धतीने केल्या जातात, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिली आहे.







