पुणे : शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक गतिमान, सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी महापालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात मेट्रो विस्तार, पीएमपी सक्षमीकरण आणि एकात्मिक वाहतूक आराखड्याची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात सवलत देण्याचाही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
सध्या पुणे मेट्रोच्या ३३.२८ किमी मार्गावरून दररोज सुमारे दोन लाख प्रवासी प्रवास करत असून, वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिका कार्यान्वित आहेत. या मेट्रोच्या विस्ताराला गती देत स्वारगेट ते कात्रज, खडकवासला ते खराडी, नळस्टॉप ते माणिकबाग आणि रामवाडी ते वाघोली या नवीन मार्गांचे काम लवकरच सुरू होणार आहे. तसेच छत्रपती शिवाजीनगर ते हिंजवडी हा मेट्रो मार्ग मे महिन्यात सुरू करण्याचे नियोजन आहे. येत्या काही वर्षांत पुणे परिसरात सुमारे २०० किमी लांबीचे मेट्रो जाळे उभारण्याचा मानस आहे.
मेट्रो आणि पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) यांच्यात एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करून प्रवाशांना ‘एन्ड टू एन्ड’ सेवा देण्यावर भर देण्यात येणार आहे. पीएमपी बस, ई-रिक्षा आणि ई-सायकल यांसारख्या फीडर सेवांच्या माध्यमातून प्रवास अधिक सुलभ करण्यात येईल. मेट्रो मार्गांच्या परिसरातील ‘टीओडी झोन’साठी सहा महिन्यांत सर्वंकष वाहतूक नियोजन आराखडा तयार केला जाणार आहे. तसेच कोथरूड, वारजे आणि दांडेकर पूल येथे मेट्रो व उड्डाणपूलांचे एकत्रित नियोजन करण्यात आले आहे.
पीएमपीच्या सक्षमीकरणासाठी या वर्षी स्वमालकीच्या एक हजार सीएनजी बस आणि जीसीसी तत्त्वावरील ५९९ बस ताफ्यात दाखल होणार आहेत. केंद्र सरकारच्या फेम-२ योजनेअंतर्गत आणखी एक हजार बस उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे. पीएमपीचा सर्वसमावेशक बिझनेस प्लॅन तयार करण्यात आला असून, सुतारवाडी-पाषाण आणि निगडी येथील भक्ती-शक्ती डेपो येथे बीओटी तत्त्वावर डेपो व व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे. शहरातील सर्व बसस्थानकांचे सक्षमीकरण आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत.
ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत ६० वर्षांवरील नागरिकांना पीएमपीच्या प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्याची योजना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ आणि परवडणारा होणार आहे.
समाविष्ट गावांच्या विकासाला गती; पाणी, रस्ते, आरोग्य आणि उद्यानांवर भर
महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या गावांच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा आणि हरित क्षेत्र विकासावर विशेष भर देण्यात आला आहे. नियोजनबद्ध विकास आराखड्याद्वारे समाविष्ट गावांना शहराच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
समाविष्ट २३ गावांसाठी विकास आराखड्याचा इरादा जाहीर करून एका वर्षाच्या आत प्रारूप आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या आराखड्यात रस्ते, पाणीपुरवठा, उद्याने, रुग्णालये आणि शाळांसाठी आवश्यक आरक्षणे निश्चित करून त्यांची अंमलबजावणी करण्यात येईल.
नव्याने समाविष्ट ३४ गावांमध्ये समान पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात बावधन बुद्रुक, सूस, म्हाळुंगे, लोहगाव आणि वाघोली या भागांमध्ये २८ साठवण टाक्यांची उभारणी करण्यात येणार आहे.
मलनिस्सारण व्यवस्थेसाठी अमृत-२ योजनेअंतर्गत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून, या वर्षात अत्यावश्यक मलवाहिन्यांचे जाळे उभारण्याचे नियोजन आहे. तसेच ११ गावांमध्ये ५० किलोमीटर लांबीच्या मलवाहिन्या टाकण्यात येणार असून, सांडपाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक केंद्रांची उभारणी केली जाईल.
सांडपाणी थेट नाले व नद्यांमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी एमबीबीआर तंत्रज्ञानावर आधारित विकेंद्रित सांडपाणी प्रक्रिया प्रणाली उभारण्यात येणार आहे. आंबिल ओढा, माणिक नाला आणि नागझरी नाल्यावर प्रायोगिक तत्त्वावर प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात येतील.
नागरिकांना प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आयुष्मान आरोग्य मंदिरांची संख्या वाढविण्यात येणार आहे. सध्या २७ केंद्रे कार्यान्वित असून, पुढील वर्षात त्यात वाढ होणार आहे.
समाविष्ट गावांमध्ये रस्ते आणि पदपथांचा विकास करण्यासाठी ३२ गावांमध्ये प्रत्येकी एक रस्ता तयार करण्यात येणार असून, त्यासोबत जागतिक दर्जाचे पदपथ उभारले जाणार आहेत.
तसेच उद्यानांसाठी आरक्षित जागा ताब्यात घेऊन विविध थीम पार्क विकसित करण्यात येणार आहेत. यामुळे हरित क्षेत्र वाढण्यासोबतच नागरिकांना विरंगुळा, व्यायाम आणि सार्वजनिक जागांचा लाभ मिळणार आहे.

