पुण्यात येणार अनाकोंडा,जिराफ…कॅन्सर हॉस्पिटल, आयव्हीएफ सुविधा, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल

Date:

निरोगी पुण्यासाठी वैद्यकीय कवच
पुणे : शहरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि सर्वसामान्यांना परवडणारी करण्यावर भर देत पुणे महानगरपालिकेच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात “निरोगी पुणे” या संकल्पनेअंतर्गत विविध महत्त्वाकांक्षी उपक्रमांची घोषणा करण्यात आली.
स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी मुख्य सभेसमोर सादर केलेल्या या अंदाजपत्रकात आरोग्य सेवांसाठी मोठी तरतूद करण्यात आली असून विद्यमान सुविधांचे सक्षमीकरण आणि नव्या सेवा सुरू करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
महापालिकेचे ५३ बाह्य रुग्ण विभाग, २० प्रसूतिगृहे, ४०० खाटांचे सर्वसाधारण रुग्णालय आणि संसर्गजन्य आजारांचे रुग्णालय कार्यरत आहेत. दररोज सरासरी १२ हजार बाह्यरुग्ण व ३०० आंतररुग्ण उपचार घेत असून दरवर्षी सुमारे ३० लाख नागरिकांना आरोग्य सेवा मिळते. दरवर्षी ८५०० प्रसूती महापालिकेच्या प्रसूतिगृहांमध्ये होतात. या सर्व सेवा विनामूल्य उपलब्ध असून शहरी गरीब औषधे व अंशदायी वैद्यकीय साह्य योजनांसाठी सुमारे १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कमला नेहरू आणि अण्णासाहेब मगर रुग्णालयांचे आधुनिकीकरण व विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहरातील आरोग्य सुविधांना बळकटी देण्यासाठी सहा प्रसूतिगृहे आणि पाच रुग्णालये मल्टीस्पेशालिटी रुग्णालयांमध्ये विकसित करण्यात येणार असून आयसीयू, एनआयसीयू आणि अत्याधुनिक नर्सिंग सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. वारजे येथे १० हजार चौरस मीटरहून अधिक जागेवर ३५० खाटांचे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

कर्करोग उपचारासाठी बाणेर येथे सार्वजनिक-खासगी भागीदारीत महापालिकेचे पहिले कॅन्सर रुग्णालय सुरू होणार असून येथे लिनियर एक्सलेरेटरद्वारे रेडिओथेरपीसारखे उपचार ‘सीजीएचएस’ दरात उपलब्ध होतील. तसेच गंगाधाम परिसरात एमआरआय व सिटी-स्कॅन केंद्र उभारण्यात येणार असून त्यामुळे महागड्या निदान चाचण्या कमी दरात उपलब्ध होतील. या सर्व उपाययोजनांमुळे पुणेकरांना स्वस्त व दर्जेदार आरोग्य सेवा शहरातच उपलब्ध होणार आहेत.

प्रसूतिगृहांमध्ये ‘आयव्हीएफ’ उपचार सेवा

महापालिकेच्या प्रसूतिगृहांमध्ये आयव्हीएफ उपचार सेवा सुरू करण्यात येणार असून वंध्यत्वावरील आधुनिक उपचार गरजू कुटुंबांना परवडणाऱ्या दरात मिळणार आहेत.

कर्करोग, डायलिसिस उपचारांसाठी आर्थिक साह्य मर्यादेत वाढ

कर्करोग आणि मूत्रपिंडाच्या आजारांसाठी डायलिसिस उपचारांवरील आर्थिक सहाय्य मर्यादा ३ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. पं. दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजनेची फेररचना करून ती अधिक सक्षमपणे राबविण्यात येणार आहे.

वैद्यकीय महाविद्यालयाचा विस्तार

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातून यंदा एमबीबीएसची पहिली बॅच बाहेर पडणार असून पदव्युत्तर शिक्षण, जेरियाट्रिक केअर सेंटर, आयव्हीएफ सुविधा आणि दिव्यांग मुलांसाठी विशेष देखभाल युनिट सुरू करण्याचे नियोजन आहे. नायडू रुग्णालय परिसरात विद्यार्थी वसतिगृह व कर्मचारी निवासासाठी १४ मजली इमारत उभारण्यात येणार आहे.

कात्रज प्राणीसंग्रहालयाचा विकास, ‘नमो गार्डन’ आणि मिरॅकल गार्डनची संकल्पना

शहरातील हरित क्षेत्रांचा विस्तार आणि नागरिकांना दर्जेदार विरंगुळ्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात उद्यान आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांवर विशेष भर देण्यात आला आहे.

स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात “उद्याने – शहराचा श्वास” या संकल्पनेअंतर्गत विविध महत्त्वाकांक्षी योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.

कात्रज येथील १३० एकर क्षेत्रावर विस्तारलेल्या राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाचा आंतरराष्ट्रीय दर्जात विकास करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. सध्या येथे १०४ वन्यजीव प्रजाती असून ती संख्या १५० पर्यंत वाढविण्यात येणार आहे. जिराफ, झेब्रा, आफ्रिकन चित्ता, अनाकोंडा, बबून यांसारख्या विदेशी प्रजातींचा समावेश केला जाणार असून बर्ड पार्कमध्ये देशी-विदेशी पक्ष्यांच्या साठ प्रजातींचे संवर्धन केले जाईल. कालबाह्य झालेल्या सर्पोद्यानाचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून संग्रहालयासाठी भव्य प्रवेशद्वार उभारण्याचेही नियोजन आहे.

शहरात सध्या २१६ उद्याने असून आणखी आठ उद्यानांची कामे सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नमो गार्डन’ संकल्पनेतून प्रेरणा घेत विविध राज्यांच्या संस्कृती, कला आणि जीवनशैलीचे दर्शन घडविणारी थीम आधारित उद्याने विकसित करण्यात येणार आहेत. अर्बन ९५ संकल्पनेअंतर्गत लहान मुलांसाठी सुरक्षित आणि आकर्षक जागा निर्माण करण्यात येणार असून कोंढवा खुर्द येथे नेचर बेस्ड फॅमिली पार्क विकसित होत आहे.

पर्यटनाला चालना देण्यासाठी शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘मिरॅकल गार्डन’ उभारण्यात येणार आहे. यामध्ये आकर्षक फुलांची रचना आणि थीम आधारित उद्यान संकल्पना साकारण्यात येणार आहे. तसेच जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यान परिसरात बोटॅनिकल गार्डन उभारून जैवविविधतेचे संवर्धन आणि नागरिकांना निसर्गानुभवाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानातील कलाग्राम प्रकल्पातील प्रलंबित विकासकामे लवकरच पूर्ण करण्यात येणार आहेत.

या सर्व उपक्रमांमुळे पुणेकरांना अधिक हरित, स्वच्छ आणि आकर्षक सार्वजनिक जागा उपलब्ध होणार असून कुटुंबांसाठी दर्जेदार विरंगुळा केंद्रे निर्माण होतील. प्राणीसंग्रहालय आणि मिरॅकल गार्डनमुळे पर्यटनाला चालना मिळेल, तर उद्यानांमधील सुविधा वाढल्याने नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

५४ किमी भुयारी रस्ते, नदी पुनरुज्जीवन आणि गृहनिर्माण प्रकल्पांना चालना

पुणे : शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेच्या २०२६-२७ च्या...

‘सीएसआर’ कक्ष अधिक सक्षम करून ,अ‍ॅमेनिटी स्पेसेस भाडेतत्त्वावर देऊन उत्पन्न वाढविणार

महसूल व्यवस्थापनावर भरस्वतंत्र महसूल समिती, विशेष कक्ष आणि करसंकलन...

चांदणी चौक परिसरात ५० एकर जागेवर ‘शिवसृष्टी,लोहगावला भारत मंडपम, रोप-वे, ऑर्बी हवाई अनुभव:

सांस्कृतिक वारसा जतनासह पर्यटनाला चालना पुणे : शहराच्या सांस्कृतिक वारशाचे...