पुणे- महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३० मधील विविध कामे तसेच शिवणे ते खराडी कर्वेनगर हद्दीमधील १२० फुटी डीपी रस्त्यांचे काम जिथे जिथे भूसंपादन झालेले आहे ,किंवा महापालिकेच्या मालकीची जागा आहे तिथे तिथे तातडीने सुरु करण्याची कार्यवाही करू असे आश्वासन येथे पुणे महापालिका पथ विभागाचे मुख्य अभियंता राजेश बनकर यांनी त्यांच्या सर्व पथ विभागाचे अधिकारी यांच्यासमवेत या प्रभागातील विविध रस्त्यांची तब्बल दोन ते अडीच तास पाहणी केल्यानंतर दिले,

महापालिका शहर सुधारणा समितीचे सदस्य , नगरसेवक स्वप्नील देवराम दुधाने यांनी सांगितले कि अधिकाऱ्यांनी आपल्या समवेत केलेल्या पाहणी दरम्यान खालील कामे सत्वर पूर्ण करण्यासाठी कार्यवाही सुरु करत असल्याचे आश्वस्त केले आहे.
पहा नेमकी कोणती कामे.
- शिवणे ते खराडी कर्वेनगर हद्दीमधील १२० फुटी डीपी रस्त्यांमधील नव्याने ताब्यात आलेल्या जागेवर रस्त्याचे काम चालू करण्यात यावे. तसेच सनसिटी ते कर्वेनगर या उड्डाणपूलाच्या अनुषंगाने कर्वेनगर हद्दीमधे विविध उपाययोजना खालील प्रमाणे करण्यात याव्या.
- ट्री हाउससमोरील १२ मी. डीपी रस्ता तसेच भालेकर उद्यानासमोरील १२ मी. डीपी रस्ता वनवे करण्याकरिता वाहतूक विभागाची परवानगी घ्यावी.
- जावळकर वस्तीमधील ३० मी. रस्ता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जोडणे
- शाहू कॉलनी लेन नं. १ मधील १२ मी. रस्ता पूर्ण करणे
- शंभर फुटी डीपी रोडलगत असणाऱ्या कुलश्री कॉलनी, यशश्री कॉलनी, वेदांत नगरी, विदिशा सोसायटी या रस्त्यांवर जड वाहतूक बंद करण्याकरिता वाहतूक विभागास पत्रव्यवहार करावा व त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्यात यावी.
- वारजे महामार्ग चौक ते कात्रजकडे जाणाऱ्या १२ मी. रस्त्यावरील ओढ्यावरील बॉक्स कलव्हर्ट रस्त्याचे काम दि. ३१ मे २०२६ म्हणजेच पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे
- तिरुपतीनगर येथील लाईटहाऊस समोरील अर्धवट डीपी रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे.
- वारजे हद्दीमधील सागर हॉटेल ते अक्षय कॉलनीपर्यंत उर्वरित पदपथचे काम चालू करण्यात यावे.
- पश्चिम रंग सोसायटी बाहेरील २४ मी. रस्ता पुणे महानगरपालिकेच्या मालकीच्या असल्याने सदर रस्त्याचे काम सुरू करणे
- शाहू कॉलनी लेन नंबर २ ते लेन नंबर ११ पर्यंत बरेच दिवस रखडलेला पाणंद रस्ता पूर्ण करणे
- कर्वेनगर स्मशानभूमीच्या बाहेर चालू असलेल्या आरसीसी बॉक्स कलव्हर्टचे काम ३१ एप्रिल २०२६ पूर्वी पूर्ण करणे


