पुणे, : देवाची उरुळी येथे ५०० टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी विनानिविदा काढण्यात आलेला प्रस्ताव मागे घेण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी येथे दिली.कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि गटनेते चंद्रकांत कदम यांनी याप्रकरणी आयुक्त नवल किशोर राम यांच्यावर ते दबावाखाली काम करत असल्याचे आरोप केले होते .
स्थायी समितीच्या बैठकीमध्ये ऐनवेळी उरुळी येथील कचरा डेपोच्या आवारात ओल्या कचऱ्यावर ५०० टन क्षमतेचा प्रकल्प करण्याचे काम भूमी ग्रीन एनर्जी या कंपनीला देण्याचा प्रस्ताव ऐनवेळी आणला होता. २० वर्षे ६९० रुपये प्रति टन टिपिंग फी व दरवर्षी १० टक्के वाढ असे या प्रस्तावात नमूद केले होते. परंतु ऐनवेळी बैठकीत काँग्रेस सदस्य प्रशांत जगताप यांनी एवढ्या दीर्घकाळासाठी विनानिविदा प्रस्ताव आणण्यास विरोध करत, तो कार्यपत्रिकेवर घेण्याची मागणी केल्याने हा विषय बारगळला. मात्र, विनानिविदा आणलेल्या या प्रस्तावावरून प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
यासंदर्भात आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, “हडपसर येथील उघड्यावरील कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला असून, याबाबत न्यायालयात खटला सुरू आहे. ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावायची असल्याने तातडीने प्रक्रिया करणे गरजेचे आहे. प्रकल्प उभारण्यासाठी येणारा ४० ते ५० कोटी रुपये खर्च संबंधित ठेकेदारानेच करायचा आहे. परंतु यासाठी १० वर्षे अधिकचे काम देण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर कालावधी जास्त होत असल्याचे निदर्शनास आले, त्यामुळे प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय झाला होता. परंतु तत्पूर्वीच प्रस्तावावर माझी स्वाक्षरी झाल्याने तो स्थायी समितीमध्ये गेला होता.”
भूमी ग्रीन एनर्जीला कचरा प्रकल्प विनानिविदा देण्याचा प्रस्ताव मागे….
Date:

