मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. रेवती सुळे आणि नागपूरचे उद्योगपती सारंग लखानी यांचा विवाह 20 जून रोजी मुंबईत पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. या विवाहसोहळ्यामुळे पवार कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तयारीलाही वेग आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा विवाहसोहळा मुंबईतील एका प्रतिष्ठित ठिकाणी भव्य स्वरूपात आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्यातील आणि देशातील अनेक नामांकित राजकीय नेते, उद्योगपती तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पवार आणि लखानी कुटुंबीयांकडून या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू असून प्रत्येक गोष्ट विशेष ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
विवाहानंतरही विविध ठिकाणी स्वागत समारंभांचे आयोजन करण्यात येणार आहे. पहिला रिसेप्शन मुंबईत पार पडेल, तर वरपक्ष नागपूरचा असल्याने तेथेही खास कार्यक्रम ठेवण्यात येणार आहे. याशिवाय, पवार कुटुंबाचे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्व लक्षात घेता दिल्लीतही एक भव्य स्वागत समारंभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा विवाहसोहळा केवळ कौटुंबिक न राहता राजकीय आणि सामाजिक दृष्ट्याही चर्चेचा विषय ठरणार आहे.
सारंग अरुण लखानी हे नागपूरचे रहिवासी असून ते विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या अरुण लखानी यांचे सुपुत्र आहेत. सारंग हे केवळ उद्योग क्षेत्रातच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रातही सक्रिय असून ते एक कुशल बॅडमिंटनपटू आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या विवाह जुळवण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी महत्त्वाची ठरल्याचे सांगितले जाते.
पवार कुटुंबात आनंदाचे वातावरण
रेवती सुळे यांनीलंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून शिक्षण पूर्ण केले आहे. त्या शैक्षणिकदृष्ट्या सक्षम असून बारामती लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी प्रथमच आई सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. रेवती सुळे आणि विजय सुळे अशी दोन मुले सुप्रिया सुळे यांना आहेत. आता रेवती सुळे यांच्या विवाहामुळे पवार कुटुंबात आनंदाचे वातावरण असून हा सोहळा राज्यातील चर्चेचा प्रमुख विषय ठरत आहे.

