मुंबई-भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच एसआयटी नेमली. पण निम्मे मंत्रिमंडळ यात अडकण्याची शक्यता असल्याने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला, असा खळबळजनक दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे.
नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे अवघ्या राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणी अडचणीत सापडलेल्या रुपाली चाकणकर यांनी आपल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन अटकेची टांगती तलवार उभी राहिली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार भास्कर जाधव यांनी उपरोक्त दावा केला आहे. ते म्हणाले, रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेतला हे चांगलेच झाले. पण हे प्रकरण केवळ त्यांच्यापुरतेच मर्यादित नाही. या प्रकरणात अनेक उच्चपदस्थ अधिकारी आहेत.
भास्कर जाधव म्हणाले, अशोक खरात प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच एसआयटी नेमण्यात आली. पण निम्मे मंत्रिमंडळ यात असल्याने हे प्रकरण बाहेर येऊ द्यायचे नव्हते. केवळ पत्रकार व पीडित महिलेमुळे हे प्रकरण बाहेर आले. अन्यथा हे प्रकरण सरकारने केव्हाच दाबले असते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही एसआयटी केव्हा स्थापन केली? याची माहिती द्यावी.
सरकारने अधिवेशन काळात या प्रकरणाची वस्तुस्थिती मांडणे गरजेचे होते. कारण, यात फक्त रुपाली चाकणकर किंवा इतर राजकीय पुढारी आहेत असे नाही. यात उच्चपदस्थ अधिकारीही आहेत. अशोक खरातची उठबस करण्यात ते गुंतलेत. त्यामुळे केवळ चाकणकरांचा राजीनामा घेऊन सरकारने या विषयावरील लक्ष इतरत्र वळवू नये. राजीनामा झाला म्हणजे हे प्रकरण संपणार नाही. सरकारमधील अनेक मंत्री व अधिकारी यात असल्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे. या प्रकरणात आयएएस, आयपीएस अधिकारी असल्याचे पोलिसांनाही ठावूक होते.
आता हे प्रकरण तडीस जावे असा आमचा प्रयत्न आहे. पण सरकारची एकूण वृत्ती पाहता या प्रकरणात काही पुढारी व अधिकाऱ्यांच्या फायली आपल्या बुडाखाली दाबून त्याचा राजकीय स्वार्थासाठी केला जाईल, असे ते म्हणाले.
भास्कर जाधव पुढे म्हणाले, राजकीय पुढाऱ्यांना अघोरी विद्या व अघोरी प्रकार का लागतात हे कळत नाही. फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेऊन असे शेण खाणाऱ्या लोकांना चांगला धडा शिकवला पाहिजे. या सरकारकडून आम्हाला कोणतीही अपेक्षा नाही. आमचा महाराष्ट्र पुरोगामी असल्याचे आम्ही सांगतो. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज म्हणून उर बडवतो. अंधश्रद्धा निर्मुलनाचे कायदे करतो. आणि दुसरीकडे हे काय सुरू आहे याचा गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे. या प्रकरणाचे धागेदोर खोलवर गुंतले असून, राज्यकर्ते अनेकांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत.
पावसाळी अधिवेशनात नाशिकच्या हॉटेलचा उल्लेख झाला तेव्हा राज्यकर्त्यांनी मागचा पुढचा विचार न करता त्या प्रकरणात क्लीनचिट दिली. नाशिकचे प्रकरण समजण्यास एवढा उशीर का? असा सवालही भास्कर जाधव यांनी या प्रकरणी उपस्थित केला.

