गायिका सानिका कुलकर्णी यांचे गायन ; श्री रामजी संस्थान तुळशीबाग तर्फे श्रीरामनवमी उत्सव ; उत्सवाचे २६५ वे वर्ष
पुणे : ठुमक चलत रामचंद्र… राम रतन धन पायो…ध्यान लागले रामाचे… यांसह प्रभू श्रीरामांचे वर्णन करणाऱ्या विविध गीतांचा आनंद घेताना रसिकांनी जणू श्रीरामांचे ध्यान लागले. पेशवेकालीन ऐतिहासिक तुळशीबाग श्रीराम मंदिरात आयोजित स्वरमैफलीत गायिका सानिका कुलकर्णी यांच्या गायनाने पुणेकरांना मंत्रमुग्ध केले.
श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने श्रीराम मंदिरात श्रीरामनवमी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाचे अखंडीत २६५ वे वर्ष साजरे होत आहे. संस्थानचे कार्यकारी विश्वस्त डॉ.रामचंद्र तुळशीबागवाले, विश्वस्त भरत तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवाराने उत्सवाचे आयोजन केले आहे.
‘वंदे गणपतीम’ या गणेश वंदनेने मैफलीला प्रारंभ झाला. त्यानंतर ‘रूप पाहता लोचनी’ या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाचे सानिका कुलकर्णी यांनी केलेले सादरीकरण रसिकांच्या विशेष पसंतीस पडले. ‘जानकी नाथ सहाय करे जब’ या भजनाला उपस्थितांनी टाळ्यांनी साथ दिली. संत तुकाराम महाराजांच्या ‘लक्ष्मी वल्लभा’ या रचनेच्या सादरीकरणाने पुणेकर मंत्रमुग्ध झाले.
डॉ.रामचंद्र तुळशीबागवाले म्हणाले, पुणे प्रांताचे सरसुभेदार श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी सन १७६१ साली स्थापन केलेले हे देखणे मंदिर आहे. यंदा दि. २ एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवांतर्गत श्रीरामरक्षा, अथर्वशीर्ष पठण, श्री विष्णू सहस्त्रनाम, श्रीसूक्त व पुरुषसूक्त पठण, महापूजा, पालखी, श्री कौसल्या माता डोहाळजेवण, श्रीरामजन्म सोहळा, श्रीरामराज्याभिषेक सोहळा अशा धार्मिक कार्यक्रमांबरोबरच रामायण वाचन, रामायण प्रवचन, सांगितीक कार्यक्रम अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. सर्व कार्यक्रम विनामूल्य आहेत. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी व्हावे

