पुणे-पुण्यात बाटलीबंद पाणी व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका पेट्रोल पंप व्यावसायिकाची २ कोटी ३४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याबाबत हडपसर परिसरातील हांडेवाडी येथे राहणाऱ्या एका व्यावसायिकाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी हे हडपसर भागातील रहिवासी असून त्यांचे वस्त्रदालन आहे. आरोपी आणि फिर्यादी व्यावसायिक एकमेकांच्या ओळखीचे होते.
आरोपींनी फिर्यादीला बाटलीबंद शुद्ध पाणी विक्री व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल, असे आमिष दाखवले. यानुसार, १७ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांच्यात भागीदारी करार झाला. या व्यवसायात गुंतवणुकीच्या नावाखाली फिर्यादीकडून १ कोटी ७८ लाख ७५ हजार रुपये घेण्यात आले.
जून ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत बाटलीबंद पाणी विक्री व्यवसायातून मिळालेले ५५ लाख ४८ हजार रुपये आरोपींनी स्वतःच्या बँक खात्यात जमा करून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पेट्रोल पंप व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलीस निरीक्षक बाबर पुढील तपास करत आहेत.

