नाशिक -पतीचे भविष्य जाणून घेण्यासाठी आलेल्या महिलेला दैवी शक्तीचा खोटा दावा करत ‘तुझ्या पतीचा मृत्यू होईल’ अशी पतीच्या निधनाची भीती घालून २ वर्ष अत्याचार करणाऱ्या ‘कॅप्टन’ अशोक खरातला गुन्हे शाखा १ च्या पथकाने मंगळवारी (दि. १८) रात्री ११.३० वाजता कर्मयोगीनगरमधील बंगल्यातून अटक केली. सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल केला असून, न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. बड्या नेत्यांसह सेलिब्रिटींचे भविष्य सांगणाऱ्या कॅप्टनच्या पेन ड्राईव्हमध्ये ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ मिळाल्याच्या चर्चेने राज्यभरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनुसार, अशोककुमार एकनाथ खरात उर्फ ‘कॅप्टन’ (तृप्ताबाला बंगला, रा. कर्मयोगीनगर) याने नोव्हेंबर २०२२ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत कॅनडा कॉर्नर येथील ओक्स प्रॉपर्टीज्च्या ऑफिसमध्ये फिर्यादी महिलेला जाळ्यात ओढले. दैवी शक्ती असल्याचे भासवून मंत्र-तंत्र व धार्मिक विधीच्या बहाण्याने महिलेला गुंगीकारक पदार्थ देऊन संमोहित केले. ‘तुझे आयुष्य बरबाद करेन’, ‘तुझ्या पतीचा मृत्यू होईल’ अशी भीती घालून वारंवार इच्छेविरुद्ध अत्याचार केला.

नेव्ही कॅप्टननंतर खरात थेट ईशान्येश्वर मंदिर ट्रस्ट अध्यक्ष
खरातने मर्चंट नेव्हीत २२ वर्षाच्या कारकीर्दीनंतर अंकशास्त्र, ‘कॉस्मॉलॉजी’चा (विश्वशास्त्र) अभ्यास केला. ‘शिवनिका ट्रस्ट’चे नेतृत्व करत २०१० पासून मिरगाव (ता. सिन्नर) येथील ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष झाला. २०२२ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मंदिरात गेले असता खरातने त्यांच्याशीही राजकीय भविष्यावर चर्चा केली. नेव्हीत असताना १५४ देशांचे दौरे केले. १३ भाषा शिकल्या.

