मुंबई,
“जाहिरातींनी केवळ प्रसार लक्षात न घेता विश्वास निर्माण केला पाहिजे,” असे प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय सचिव संजय जाजू यांनी केले. मुंबई येथे आज आयोजित ॲडट्रस्ट 2026 शिखर परिषदेत बीजभाषण करताना ते बोलत होते. यावेळी, भारतात जबाबदार, पारदर्शक आणि विश्वासार्ह जाहिरात परिसंस्थेच्या उभारणीची तातडीची गरज केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिवांनी अधोरेखित केली. विशेषतः हे क्षेत्र प्रमाण, गुंतागुंत आणि प्रभाव यांच्या बाबतीत वेगाने वाढत असताना हे अधिक आवश्यक आहे. जाहिरात क्षेत्राने वृद्धी करत राहायला हवे, मात्र या क्षेत्रात, खास करून डिजिटल विश्वात, जबाबदारीने वागणे आवश्यक आहे यावर जाजू यांनी अधिक भर दिला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा दृष्टीकोन विश्वासाची उभारणी, विकासाला पाठबळ आणि जबाबदारीची सुनिश्चिती यावर केंद्रीत आहे, असे ते म्हणाले.

भारतीय जाहिरात मानक परिषदेतर्फे (एएससीआय) आयोजित करण्यात आलेल्या पहिल्याच ॲडट्रस्ट 2026 शिखर परिषदेसाठी जाहिरात, माध्यमे, तंत्रज्ञान आणि सरकारी क्षेत्रातील प्रतिनिधींना जबाबदार जाहिरात क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचारविनिमयासाठी एकत्र आले. या परिषदेतील चर्चा नव्याने उदयाला येणाऱ्या पद्धती, कायदेशीर चौकटी तसेच नवीन तंत्रज्ञानांचा जाहिरातींच्या पद्धतींवर होणारा परिणाम यांवर केंद्रीत होत्या.
या शिखर परिषदेत बोलताना, केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव जाजू यांनी सांगितले की, जाहिरात हे केवळ एक व्यावसायिक कृती नसून ते बाजारपेठांना आकार देणारे, ब्रँड निर्माण करणारे, ग्राहकांना माहिती देणारे, संस्कृतीचे दर्शन घडवणारे आणि आकांक्षांवर प्रभाव टाकणारे क्षेत्र आहे. भारतासारख्या मोठ्या आणि वेगाने डिजिटलीकरण होत असलेल्या देशात, जाहिरात हा नवोन्मेष, आर्थिक कृती, कार्यक्रम निर्मिती आणि समावेशन यांचा महत्त्वाचा चालक बनला आहे. डिजिटल मंच आणि कृत्रिम बुद्धीमत्ता हे घटक आता प्रवेशातील अडथळे कमी करून आणि सहभागाचा विस्तार करून ब्रँड्स, स्टार्टअप्स, स्थानिक व्यवसाय आणि सर्जकांना मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे शक्य करतात.
त्याचवेळी, जाजू यांनी आर्थिक घोटाळे, दिशाभूल करणाऱ्या गुंतवणूक जाहिराती तसेच फसव्या नोकरीच्या संधी यांच्यासह डिजिटल जाहिरातींशी संबंधित जोखमींच्या संदर्भात सावधानतेचा इशारा देखील दिला. अशा जाहिराती बहुतेकदा असुरक्षित जनतेला लक्ष्य करतात असे ते म्हणाले. व्यावसायिक भाषण हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक भाग असला तरीही दिशाभूल करणाऱ्या आणि फसव्या जाहिरातींचे नियमन करता येते आणि ते केलेच पाहिजे यावर त्यांनी अधिक भर दिला.
जाहिरात क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका, डीपफेक, डार्क पॅटर्न्स तसेच प्रभावक-विरोधी विपणनाकडे वाढता कल यांसारख्या नव्याने उदयाला येत असलेल्या समस्यांबाबत सदर परिषदेत महत्त्वपूर्ण चर्चा झाल्या. त्यांनी जाहिरातदारांना जाहिरातींची पोहोच लक्षात घेतानाच त्यांच्या विश्वासार्हतेवर अधिक लक्ष केंद्रीत करण्याच्या, तर सर्जक आणि प्रभावक यांना अस्सलपणा राखून आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती टाळून प्रेक्षकांचा विश्वास सुरक्षित करण्याच्या सूचना दिल्या.

जाजू यांनी त्यानंतर जबाबदारीने जाहिरात करण्यासंबंधीची पाच प्रमुख तत्त्वे पुढे विषद केली, ती पाच तत्वे म्हणजे: i) सर्व संवादांमध्ये सत्याशी तडजोड करता कामा नये, ii) जाहिरात, प्रायोजकत्व आणि प्रचारात्मक संबंध ओळखण्यासाठी पारदर्शकतेची आवश्यकता, iii) सर्व आशयाची रचना आणि वितरण मार्गदर्शक असेल याची जबाबदारी, iv) दुर्बल गटांच्या, विशेषतः मुलांच्या संरक्षणाला प्राधान्य देण्याची आवश्यकता, v) विश्वासार्हतेसह नवोन्मेष करताना तांत्रिक आणि सर्जनशील प्रगतीमुळे विश्वास कमी होण्याऐवजी तो अधिक दृढ होईल याची खबरदारी घेण्याची आवश्यकता.
संजय जाजू यांनी शिखर परिषदेत, एएससीआय च्या सरचिटणीस आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा कपूर, मॅडिसनचे अध्यक्ष सॅम बलसारा, एएससीआयचे अध्यक्ष आणि पिडीलाइट इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक सुधांशू वत्स, एएससीआय संचालक मंडळाचे सदस्य प्रवीण त्रिपाठी आणि खैतान अँड कंपनीचे भागीदार इशान जोहरी आणि तनु बॅनर्जी यांच्यासमवेत ‘जाहिरात कायदा संकलन’ (अॅडव्हर्टाइजमेंट लॉ कम्पेडियम) चे संयुक्तरीत्या प्रकाशन केले. हे संकलन संपूर्ण जाहिरात उद्योगात अधिक जागरूकता, जाणीव आणि अनुपालनाला प्रोत्साहन देईल तसेच जाहिरातविषयक कायदे आणि नियमांच्या बाबतीत व्यावहारिक मार्गदर्शक ठरेल अशा पद्धतीने तयार करण्यात आले आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिवांनी एएससीआय च्या नेतृत्वासह, विपणनकर्ते, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि कायदेविषयक क्षेत्रातील सदस्यांसह जाहिरात उद्योगातील भागधारकांसोबतही बैठक घेतली.

