पुणे
अर्जासोबत धर्मादाय आयुक्तांकडील प्रमाणपत्र सादर करू शकले नाहीत म्हणून भाजपच्या स्वीकृत सदस्यपदासाठीचे दोन उमेदवारांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे महापालिकेच्या मुख्यसभेत बुधवारी
१८) दहाऐवजी आठ सदस्यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली. जयप्रकाश पुरोहित आणि प्रियांका शेंडगे असे अर्ज बाद झालेल्या भाजपच्या सदस्यांची नावे आहेत.
महापालिकेत दहा स्वीकृत नगरसेवक पदांसाठी राजकीय पक्षांकडून अर्ज मागविण्यात आले होते. नगरसेवकांच्या संख्याबळानुसार यामध्ये भाजपचे ७, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन आणि काँग्रेसच्या एक सदस्याची वर्णी लागणार होती.
भाजपने नीलेश कोंढाळकर, रवींद्र साळेगावकर, राजेंद्र काकडे, विश्वास ननावरे, उदय लेले, प्रियांका शेडगे आणि जयप्रकाश राजपुरोहीत या जुन्या कार्यकर्त्यांना संधी दिली होती. त्यानुसार, महापालिका आयुक्तांकडे अर्ज दाखल केले होते. अर्ज छाननीत शेंडगे आणि राजपुरोहीत यांनी अर्जासोबत धर्मदाय आयुक्तांकडील प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांचे अर्ज बाद झाले.
दरम्यान, बुधवारी सर्वसाधारण सभेत शेंडगे आणि राजपुरोहीत वगळता उर्वरित पाचही सदस्यांची नावे जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दत्तात्रेय धनकवडे आणि राकेश कामठे, तर काँग्रेसतर्फे सुनील शिंदे यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.
स्मार्ट सिटीवर दोन संचालक, तर सर्वसाधारण सभेत स्मार्ट सिटी कंपनीवर संचालक नेमण्याचा विषय होता. काँग्रेसतर्फे विशाल मलके, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे नगरसेविका अनिता इंगळे यांना संधी देण्यात आली.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस युतीत निवडणुका लढल्या असून, एकत्रितच गटनोंदणी केली. या मुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन स्वीकृत नगरसेवक होऊ शकले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने स्मार्ट सिटी कंपनीवर ‘शरदचंद्र पवार पक्षा’ला संधी दिली.
दहापैकी आठजणांची नियुक्ती झाल्याने उर्वरित दोन जागांसाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा राबविली जाणार आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या मुख्यसभेत ही नियुक्ती होणार आहे.
यासाठी नव्याने अर्ज सादर करावे लागणार असल्याचे नगरसचिव योगिता भोसले यांनी सांगितले.
पीएमपीच्या संचालकपदी अजय खेेडेकर
पीएमपीएमएलच्या संचालक मंडळात नगरसेवकांपैकी एकाची नियुक्ती करण्यात येते. संख्याबळाच्या आधारे हे पद सर्वाधिक सदस्यसंख्या असलेल्या भाजपकडे जाते. भाजपतर्फे नगरसेवक अजय खेडेकर यांची संचालकपदावर नियुक्ती केली. खेडेकर हे शुक्रवार पेठ घोरपडी पेठ प्रभागातून सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत.
अर्ज बाद , पण उमेदवार बदलणार नाही
भाजप सदस्यांची अर्जासोबतची कागदपत्रे वेळेत सादर झाली नसल्याने अर्ज बाद झाले. पुन्हा निवडीवेळी या उमेदवारांचे अर्ज भरले जातील. तसेच, याच दोन्ही उमेदवारांना संधी दिली जाणार असून, पुढील मुख्यसभेत त्यांची नियुक्ती होईल. तांत्रिक बाबीमुळे त्यांची निवड झाली नाही.
- धीरज घाटे, भाजप शहराध्यक्ष

