साडेपाच कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता
पुणे : हडपसर- काळेबोराटे नगर रस्त्यावरील पुणे मिरज रेल्वे मार्गिकेवर काळे बोराटेनगर (गेट क्रमांक सहा) येथे पादचारी भुयारी मार्ग उभारण्याला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. यासाठी पाच कोटी ३७ लाख रुपये खर्च अपेक्षित असून हे काम रेल्वेमार्फत केले जाणार आहे. त्यासाठी टप्प्याटप्प्याने रेल्वेला निधी देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली,अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. या रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूस शाळा असल्याने विद्यार्थ्यांची तसेच पालकांची मोठी वर्दळ असते तसेच वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना रेल्वेमार्ग ओलांडताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेवून हा भुयारी मार्ग उभारला जाणार आहे.
हडपसर व काळे बोराटेनगर येथील हे रेल्वे गेट पुणे- मिरज रेल्वे मार्गावर आहे. त्यामुळे दिवसभरात सातत्याने हे गेट बंद झाल्यास या भागातील शालेय मुले तसेच पालक जीव मुठीत घेवून या ठिकाणच्या वाहतूक कोंडीतून रस्ता ओलांडत होते. यात अनेकदा रुग्णवाहिकाही अडकल्या आहे. तसेच रेल्वे क्रॉसिंग करताना मुलांचे अपघातही घडलेले आहे. या पार्श्वभूमीवर येथे भुयारी मार्गाची मागणी सातात्याने केली जात होती. या रेल्वेगेटवर भविष्यात उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन असले तरी, रस्ता अरूंद असल्याने तांत्रिक अडचणींमुळे त्याला उशीर होणार आहे. त्यामुळे, पादचारी नागरिकांच्या सोयीसाठी हा भुयारी मार्ग उभारला जाणार आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकात यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद होती. याचबरोबर उर्वरित निधी टप्याटप्प्याने रेल्वेला उपलब्ध करून दिला जाईल. महापालिकेकडून रेल्वेला निधी उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर रेल्वेकडून काम सुरू होईल. या भुयारी मार्गामुळे येथील कोंडी कायमची दूर होऊन स्थानिक रहिवाशांना मोठा दिलासा मिळेल, असे भिमाले यांनी नमूद केले.
हडपसर-काळबोराटेनगर पादचारी भुयारी मार्गास मान्यता
Date:

