श्री रामजी संस्थान तुळशीबाग ; विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम
पुणे : श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने श्रीराम जन्मोत्सवानिमित्त तुळशीबाग येथील श्रीराम मंदिरात दि. १९ मार्च ते २ एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवांतर्गत श्रीरामरक्षा, अथर्वशीर्ष पठण, श्री विष्णू सहस्त्रनाम, श्रीसूक्त व पुरुष सूक्त पठण, महापूजा, पालखी, श्री कौसल्या माता डोहाळजेवण, श्रीरामजन्म सोहळा, श्रीरामराज्याभिषेक सोहळा अशा धार्मिक कार्यक्रमांबरोबरच रामायण वाचन, रामायण प्रवचन, सांगितीक कार्यक्रम अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थानचे कार्यकारी विश्वस्त डॉ.रामचंद्र तुळशीबागवाले यांनी दिली.
संस्थानचे विश्वस्त भरत तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, यांसह तुळशीबागवाले परिवाराने उत्सवाचे आयोजन केले आहे. पुणे प्रांताचे सरसुभेदार श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी सन १७६१ साली स्थापन केलेल्या देखण्या मंदिरामधे यंदाचे श्रीरामनवमी उत्सवाचे अखंडीत २६५ वे वर्ष साजरे होत आहे.
गुढीपाडव्याला गुरुवार, दिनांक १९ मार्च रोजी श्रीरामनवमी उत्सवास प्रारंभ होणार असून त्यादिवशी सकाळी ७ पासून श्रीरामास पवमान अभिषेक, श्रीरामरक्षा, अथर्वशीर्ष, श्रीविष्णूसहस्त्रनाम, श्रीसूक्त व पुरूषसूक्त पठण होणार आहे. तसेच दि. १९ ते २५ मार्च दरम्यान दररोज सकाळी ९ वाजता श्री गणेश्वर शास्त्री पारखी हे रामायण वाचन, दुपारी १२ वाजता श्रीरामांची महापूजा व आरती, सायंकाळी ७.३० वाजता श्रीरामांच्या छबिन्याची मिरवणूक व आरती महापूजा होणार आहे.
बुधवार, दि. २५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता श्री कौसल्या माता डोहाळजेवण होणार आहे.
श्रीराम जन्मानिमित्त गुरुवार, दि. २६ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता ह.भ.प. दर्शनबुवा वझे यांचे श्रीरामजन्माचे कीर्तन होणार असून सकाळी ११ वाजता श्रीरामांच्या पोषाखाची मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर श्रीरामजन्माचा मुख्य सोहळा दुपारी १२.४० वाजता साजरा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता श्रीरामांच्या छबिन्याची मिरवणूक निघणार आहे.
शनिवार, दिनांक २८ मार्च रोजी सकाळी ७ वाजता ह.भ.प. दर्शनबुवा वझे यांचे लळीत व पायघडीचे कीर्तन आणि समस्त तुळशीबागवाले परिवाराकडून श्रीरामराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. गुरुवार, दिनांक २ एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी ६ वाजता ब्रह्मवृंदाकडून श्रीहनुमंतास रुद्राभिषेक व सकाळी ६.३० वाजता ह.भ.प.दर्शनबुवा वझे यांचे श्रीहनुमान जन्माचे कीर्तन होणार आहे. सोमवार, दि. १३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता श्रीसत्यनारायण महापूजेने श्रीरामजन्मोत्सव उत्सवाची सांगता होणार आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत विविध कलाकारांची गायनसेवा
उत्सवादरम्यान गुरुवार, दि. १९ मार्च रोजी सयंकाळी ५.३० वाजता सानिका कुलकर्णी यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे. तर, रविवार, दि. २२ मार्च रोजी आनंद भाटे यांचे सुश्राव्य गायन, मंगळवार, दि. २४ मार्च रोजी अविष्कार क्रिएशन भाग्यश्री कुलकर्णी प्रस्तुत रामगान हे कार्यक्रम सायंकाळी ५.३० वाजता होणार असून सर्व कार्यक्रम विनामूल्य आहेत. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले यांनी केले आहे.

