लोणावळा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे, दि. १६ मार्च २०२६– वसुलीसाठी गेलेल्या महिला वीज कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे परिमंडलात महावितरण कंपनीची वीजबिल वसुली मोहीम जोरदार सुरू आहे. सोमवारी (दि.१६) दुपारी २.१० च्या सुमारास रवी पांगोळी सोसायटीमध्ये अनिकेत मालपुटे या कंत्राटी कामगारासह महिला वरिष्ठ तंत्रज्ञ करिश्मा मुकेश पाटील वसुलीसाठी गेल्या होत्या. शाम रामचंद्र पवार यांच्या नावाने असलेल्या वीज कनेक्शनचे फेब्रुवारीचे ९८० रुपये व मार्च महिन्याचे ९९० रुपये थकीत होते. करिश्मा पाटील यांच्या सांगण्यावरून अनिकेत मालपुटे कनेक्शन तोडत होते. त्यावेळी स्वतः ला मालक म्हणून सांगणाऱ्या जयनिल दोशी याने अनिकेतला विरोध केला. तेंव्हा करिश्मा पाटील स्वतः कनेक्शन तोडू लागल्या. त्यावेळी जयनिल दोशी याने त्यांना अटकाव करत श्रीमती पाटील यांना मागे ओढून जोरात धक्का दिला, ज्यामुळे त्या खाली पडल्या. इतकेच नाही तर, आरोपीने त्यांच्या सहकाऱ्याच्या दुचाकीची चावी काढून घेऊन त्यांना तिथून जाण्यास मज्जाव केला आणि वाद घातला.
त्यामुळे करिश्मा पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून, लोणावळा शहर पोलिसांनी आरोपी जयनिल दोशी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २२१ अन्वये सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार शशिकांत खोपडे करत आहेत.

