पुणे, दि. १७ : पुणे ARO तर्फे अग्नीवीर भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया १३ फेब्रुवारी २०२६ ते १ एप्रिल २०२६ या कालावधीत सुरू असून पुणे, बीड, लातूर, धाराशिव, अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्यांसाठी ZRO पुणे यांनी नोटिफिकेशन प्रसिद्ध केले आहे.
नोटिफिकेशननुसार अग्नीवीर भरतीची लेखी परीक्षा अंदाजे १ जून ते १५ जून २०२६ दरम्यान होणार असून त्यानंतर मैदानी चाचणी व वैद्यकीय तपासणी होणार आहे.
या भरतीत यश मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासन अंगीकृत माजी सैनिक महामंडळ (मेस्को) संचलित मेस्को करिअर अकॅडमी, सातारा येथे विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. येथे सैनिक जीडी, क्लार्क, स्टोअर किपर, नर्सिंग असिस्टंट व टेक्निकल या संवर्गांसाठी अनुभवी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली लेखी व मैदानी परीक्षेचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच प्रशिक्षणार्थ्यांसाठी माफक शुल्कात राहण्याची व जेवणाची सुविधा उपलब्ध आहे.
इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी मेस्को करिअर अकॅडमी, टी.सी.पी.सी. आवार, कारंजे नाका, सातारा येथे संपर्क साधावा किंवा ९१६८९८६८६४ / ७४१५८४८०१३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करून या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन लेफ्टनंट कर्नल सतेश दैवानराव हंगे (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे.
000

