पुणे दि.१५: पुणे जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा आणि संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या प्रमुख पर्यटन स्थळांकडे पर्यटकांनी पाठ फिरवल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. भारतीय पुरातत्व विभाग (ASI) आणि स्थानिक प्रशासन यांच्यातील समन्वयाचा अभाव, तसेच मूलभूत सुविधांची दुरवस्था यामुळे जिल्ह्याचा पर्यटन विकास रखडला असून, याप्रकरणी विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या निवेदनात पुराव्यांसह माहिती दिली आहे की, एकेकाळी पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या शनिवारवाड्याला २०१७-१८ मध्ये १४ लाख २४ हजार पर्यटकांनी भेट दिली होती. मात्र, ही संख्या आता लक्षणीयरीत्या घटली आहे. येथील प्रसिद्ध ‘लाईट अँड साऊंड शो’ तांत्रिक कारणास्तव आणि निधीअभावी बंद असल्याने पर्यटकांचा हिरमोड होत आहे.
केवळ शनिवारवाडाच नव्हे, तर पावसाळ्यात पर्यटकांनी गजबजणाऱ्या लोहगड किल्ल्यावरही पर्यटकांची संख्या ४० टक्क्यांनी घटली आहे. कार्ले-भाजे लेणी आणि आगाखान पॅलेस या ठिकाणीही महसुलात मोठी घट झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.
पर्यटन स्थळांच्या या दुरवस्थेसाठी भारतीय पुरातत्व विभागाच्या (ASI) कडक नियमावलीचा आणि स्थानिक प्रशासनासोबतच्या समन्वयाचा अभाव कारणीभूत असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. नवीन सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी किंवा जुन्यांची दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक परवानग्या मिळण्यास होणारा विलंब ही सर्वात मोठी अडचण ठरत आहे. यामुळे या जागतिक दर्जाच्या वारसा स्थळांवर पिण्याचे पाणी, रस्ते आणि आधुनिक स्वच्छतागृहांचा मोठा अभाव जाणवत आहे.
जिल्हा प्रशासनाने पुरातत्व विभागाशी तातडीने समन्वय साधून प्रलंबित परवानग्यांचे प्रश्न निकाली काढावेत. शनिवारवाडा येथील ‘लाईट अँड साऊंड शो’ पुन्हा सुरू करण्यासाठी तांत्रिक मदत आणि आवश्यक निधीची उपलब्धता करून द्यावी.
लोहगड, आगाखान पॅलेस आणि लेणी परिसरात पर्यकांसाठी मूलभूत सुविधांचे जाळे तातडीने निर्माण करावे अशी सूचना डॉ.गोऱ्हे यांनी केली आहे.
पुणे जिल्ह्याचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आणि स्थानिक रोजगार वाढवण्यासाठी पालकमंत्र्यांनी या विषयात गांभीर्याने लक्ष देऊन सकारात्मक पावले उचलावीत, अशी अपेक्षा डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे.

