मुंबई-घरगुती गॅस (LPG) वापरणाऱ्या कोट्यवधी ग्राहकांसाठी केंद्र सरकारने ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य केली आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास ग्राहकांना मिळणारी गॅस सबसिडी बंद होऊ शकते, इतकेच नव्हे तर गॅस कनेक्शन निलंबित होण्याचीही दाट शक्यता आहे. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आता गॅस एजन्सीच्या रांगेत उभे राहण्याची गरज उरलेली नाही. ग्राहक आपल्या मोबाईलवरूनच ही पडताळणी मोफत पूर्ण करू शकतात.
पेट्रोलियम मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पारदर्शकता आणि योग्य लाभार्थ्यांपर्यंत सबसिडी पोहोचवण्यासाठी बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे. ग्राहकांनी जर ही प्रक्रिया टाळली, तर त्यांना दरमहा मिळणारा ३०० ते ४०० रुपयांचा सबसिडीचा लाभ गमवावा लागेल. तसेच, नवीन सिलिंडर बुक करताना अडचणी येऊ शकतात किंवा कंपनीकडून डिलिव्हरी रद्द केली जाऊ शकते.
ई-केवायसी पूर्ण न केल्यास ग्राहकांना सिलिंडरची संपूर्ण रक्कम भरावी लागेल. यामुळे प्रति सिलिंडर मिळणारा ३०० ते ४०० रुपयांचा सबसिडीचा फायदा ग्राहकांना गमवावा लागू शकतो. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी तात्काळ आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे.
घरबसल्या ‘ई-केवायसी’ करण्याची सोपी पद्धत
तुम्ही इंडेन (Indane), भारत गॅस (Bharat Gas) किंवा एचपी गॅस (HP Gas) यापैकी कोणत्याही कंपनीचे ग्राहक असाल, तर खालील चरणांचा वापर करून केवायसी करू शकता:
१. ॲप डाउनलोड करा: गुगल प्ले स्टोअरवरून तुमच्या गॅस कंपनीचे अधिकृत ॲप आणि ‘Aadhaar FaceRD’ हे ॲप डाउनलोड करा.
२. लॉगिन: नोंदणीकृत मोबाईल नंबरद्वारे गॅस कंपनीच्या ॲपमध्ये लॉगिन करा.
३. प्रमाणीकरण: ॲपमधील ‘e-KYC’ किंवा ‘आधार प्रमाणीकरण’ (Aadhaar Authentication) या पर्यायावर क्लिक करा.
४. चेहरा स्कॅन: ‘FaceRD’ ॲपच्या मदतीने तुमचा चेहरा स्कॅन करून पडताळणी पूर्ण करा.
दरम्यान, ज्यांना मोबाईलवर ही प्रक्रिया करणे शक्य नाही, ते आपल्या गॅस एजन्सीवर जाऊनही बायोमेट्रिक मशीनद्वारे किंवा फॉर्म भरून ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. ही सेवा पूर्णपणे मोफत आहे.
सिलिंडर बुकिंगमध्ये अडथळे: तुमचे गॅस बुकिंग स्वीकारले जाणार नाही. सबसिडी मिळणार नसल्याने ग्राहकांना सिलिंडरची पूर्ण किंमत मोजावी लागेल. दीर्घकाळ केवायसी प्रलंबित राहिल्यास गॅस कनेक्शन कायमस्वरूपी निलंबित किंवा ब्लॉक केले जाऊ शकते.

