एस. एन. डी. टी. विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांचे प्रतिपादन
स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था आयोजित नारी शक्ती – सन्मान आणि संवाद उपक्रम
पुणे : स्त्री सक्षमीकरणाचा मार्ग स्त्रीशिक्षणाच्या माध्यमातूनच पुढे जाऊ शकतो. शिक्षित स्त्री अधिकाधिक कौशल्ये प्राप्त करू शकते. शिक्षणामुळे तिला आर्थिक स्वावलंबन मिळू शकते. व्यक्ती, कुटुंब आणि समाज, अशा सर्व स्तरांवर स्त्रीला निर्णयाचे स्वातंत्र्य मिळते आणि खऱ्या अर्थाने स्त्री सक्षमीकरण साध्य होते, असे प्रतिपादन एस. एन. डी. टी. विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी येथे केले. ‘महर्षी कर्वे यांच्या द्रष्टेपणामुळेच एस. एन. डी. टी. महाविद्यालयाची स्थापना होऊन, अनेक पिढ्यांतील स्त्रियांच्या सक्षमीकरणाला दिशा मिळू शकली’, असेही त्या म्हणाल्या.
स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था, हिंदुस्थान आयोजित नारी शक्ती – सन्मान आणि संवाद – २०२६(महिला दिन सप्ताह समारोप) या विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी कला, क्रीडा, उद्योग,शिक्षण, समाजसेवा अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कर्तबगार स्त्री शक्तीचा सन्मान करण्यात आला. यामध्ये बालकीर्तनकार अग्रणी साठे हिचा बाल सावरकर पुरस्काराने गौरव करण्यात आला. विशेष सन्मानार्थी म्हणून प्रेरणा सहाणे दीक्षित (कलाक्षेत्र), गौरी गाडगीळ (क्रीडाक्षेत्र), रक्षा देशपांडे (शिक्षण आणि समाजकार्य क्षेत्र), सुजाता शहा (उद्योजिका) यांचा समावेश होता. एमईएस गावडे सभागृह, भावे विद्यालय सदाशिव पेठ, येथे झालेल्या या कार्यक्रमात कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांच्यासह, श्री गुरुकुलम् न्यास, कल्याणच्या संस्थापक अध्यक्ष मंजिरी फडके, उद्योजिका आणि ‘देणे समाजाचे’ या अभिनव उपक्रमाद्वारे समाजकार्य करणाऱ्या वीणा गोखले आणि प्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका स्नेहल तरडे यांच्याशी संवादाचा उपक्रम आयोजिण्यात आला होता. डॉ. शुभा साठे आणि अनुराधा मुन्शी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी हेही व्यासपीठावर उपस्थित होते. दीपप्रज्ज्वलन करून तसेच भारतमाता, छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरवात झाली.
डॉ. चक्रदेव म्हणाल्या, महर्षी कर्वे यांनी ज्या काळात स्त्रीशिक्षणासाठी प्रयत्न सुरू केले आणि महाविद्यालयाच्या माध्यमातून ते प्रत्यक्षात आणले, तो काळ सर्वस्वी प्रतिकूल होता. त्यामुळे महर्षींना अतोनात परिश्रम करावे लागले. मात्र, कालांतराने स्त्रीशिक्षणाचा त्यांचा आग्रह किती योग्य होता, हे समाजमनाने जाणले आणि आज काही लाख मुली एस. एन. डी. टी. महाविद्यालयाच्या विविध शैक्षणिक संकुलांतून २०० पेक्षा अधिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत. कुटुंबापासून विश्वकुटुंबापर्यंत स्त्रियांचे कर्तृत्व विस्तारत आहे. मुलींच्या अनेक पिढ्या महर्षींना अभिप्रेत असलेल्या सक्षम आणि सबल स्त्रिया झाल्या आहेत, याचे समाधान मोठे आहे.
मंजिरी फडके यांनी भगवद्गीतेतील स्त्री सबलीकरणाच्या विचाराची माहिती सांगितली. सृजनशक्ती केवळ स्त्रीपाशीच असून, श्री, धृती, वाणी, मेधा, क्षमा यांच्या रूपाने स्त्रीशक्तीच्या विविध पैलूंचे गीतेत वर्णन आहे, असे त्या म्हणाल्या.
स्त्रीपाशी असलेल्या सृजनशक्तीचा, निर्मितीचा नकारात्मक अर्थ न घेता, ते वरदान मानण्याची मानसिकता निर्माण केला पाहिजे. कुटुंब हे केवळ स्त्रीचे नसून, ते प्रत्येक घटकाचे असते, याचे भान नव्या पिढीत आता दिसते आहे, हे चित्र आशादायी असल्याचे निरीक्षण स्नेहल तरडे यांनी नोंदवले.
वीणा गोखले यांनी देणे समाजाचे या उपक्रमाच्या माध्यमातून समाजमनात दातृत्वाचे संस्कार निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. डॉ. शुभा साठे यांनी प्रारंभी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्त्रीविषयक विचारांची माहिती दिली. सावरकरांचे कोणत्याही विषय़ावरील विचार समजून घेण्यासाठी त्यांचा राष्ट्रविचार आधी समजून घेणे आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या.
श्रीनिवास कुलकर्णी यांनी स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेच्या निर्मितीची व उद्देशांची माहिती दिली.
भक्ती कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. स्नेहा गाडगीळ यांनी आभार मानले.

