पुणे-शहरातील वाहनचालकांचे लक्ष विचलित करून मोबाईल आणि सोन्याचे दागिने चोरणाऱ्या ‘टकटक गँग’मधील २ भामट्यांना पोलिसांनी पकडले आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे ओमप्रकाश कोहली (वय ३८) आणि अफझल अब्बासी (वय ३८) अशी असून, दोघेही उत्तर प्रदेशातील मेरठ येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक करण्यात यश मिळवले.फरासखाना पोलीस ठाणे आणि विमाननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या टोळीची हालचाल अधिक असल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,ही टोळी प्रामुख्याने शहरातील गर्दीच्या रस्त्यांवर आणि चौकांमध्ये सक्रिय होती. सिग्नलवर थांबलेल्या वाहनांमध्ये डोकावून पाहत ते वाहनचालकांचा अंदाज घेत असत. त्यानंतर एखाद्या वाहनाने धडक दिल्याचा बनाव करून चालकाला गाडीतून बाहेर काढण्याचा किंवा वाद घालण्याचा प्रयत्न केला जात असे. या गोंधळाचा फायदा घेत दुसरा साथीदार वाहनातील मोबाईल, पर्स किंवा सोन्याचे दागिने चोरी लंपास करायचा. त्यामुळे अनेक वाहनचालकांना आपली मौल्यवान वस्तू कधी चोरीला गेली हेही लक्षात येत नसे.
फरासखाना पोलीस ठाणे आणि विमाननगर पोलीस ठाण्याच्या भागात अशा प्रकारच्या चोरीच्या अनेक घटना घडल्याची नोंद पोलिसांकडे आहे. चौकशीदरम्यान त्यांनी अशाच प्रकारे वाहनचालकांचे लक्ष विचलित करून चोरी केल्याची कबुली दिली. सध्या पोलिसांकडून या दोघांकडून आणखी कोणत्या भागात चोरी करण्यात आली आहे का, याबाबत सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणात समोर आलेले सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागले असून, त्याआधारे आणखी काही धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. शहरात बाहेरून येणाऱ्या अशा टोळ्या वाहनचालकांना लक्ष्य करत असल्याने पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सिग्नलवर किंवा रस्त्यावर अनोळखी व्यक्तीने धडक दिल्याचा किंवा इतर कारणाने वाद घालण्याचा प्रयत्न केला, तर शांत राहून परिस्थितीची खात्री करून घ्यावी.

