मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी पात्र महिलांचा फेब्रुवारी व मार्च महिन्याचा रखडलेला हप्ता सरकारने एकाचवेळी देण्याचे संकेत दिलेत. त्यानुसार, हा हप्ता पुढील महिन्याच्या 15 तारखेच्या आत मिळण्याची शक्यता आहे. पण याचवेळी ई-केवायसी न करणाऱ्या महिलांना या योजनेच्या लाभापासून मुकावे लागण्याचीही शक्यता आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू केली होती. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. राज्यातील लक्षावधी महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात या योजनेसाठी भरीव तरतूद केली आहे. तसेच ही योजना आहे तशीच अव्याहत सुरू राहण्याचीही शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी व मार्च महिन्याच्या हप्त्याचा लाभ पात्र महिलांच्या खात्यावर लवकरच वर्ग होण्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने नव्या आर्थिक वर्षात फेब्रुवारी व मार्च या 2 महिन्यांचे पैसे पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, हे पैसे एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात अथवा 15 एप्रिलपूर्वी बँक खात्यांत वर्ग केले जाण्याची शक्यता आहे. महिलांना या योजनेचा शेवटचा हप्ता जानेवारी महिन्यात मिळाला होता. तेव्हापासून लाडक्या बहिणी फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट पाहत होत्या. पण महिना संपला तरी त्यांना तो लाभ मिळाला नव्हता. पण आता त्यांना फेब्रुवारी व मार्च या दोन्ही महिन्यांचे पैसे एकाचवेळी मिळणार आहेत.
उल्लेखनीय बाब म्हणजे यावेळी काही महिलांचा या योजनेंतर्गत मिळणारा लाभही बंद होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदतवाढ दिली होती. त्यात अनेक महिलांनी ई-केवायसी केली. पण त्यातही चुका झाल्या. त्यामुळे या महिलांचा लाभ बंद झाला होता. त्यामुळे सरकारने चुका दुरुस्त करण्याची अखेरची संधी दिली आहे. त्यानुसार या महिलांना 31 मार्चपर्यंत आपली ई-केवायसी करावी लागणार आहे. यावेळी चूक होणाऱ्या महिलांचा या योजनेचा लाभ कायमस्वरुपी बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

