पुणे- लोहगाव विमानतळाच्या परिसरात रिक्षा आणि कॅब चालक हे प्रशासकीय संगनमताने प्रवाश्यांची बेसुमार लुटमार करताना दिसत असून इथे कारवाईस अक्षम असल्याचे RTO आणि वाहतूक पोलीस सांगतात ,दरम्यान पोलिसांच्या वाहतूक शाखेने स्वारगेट परिसरात अवैध प्रवासी रिक्षांविरुद्ध विशेष मोहीम राबवली. आणि २ दिवसात ३७५ रिक्षांवर कारवाई केली . तुम्ही तुमच्या घरून लोहगाव येथील विमानतळावर जर रिक्षा मीटर ने २०० रुपयात पोहोचत असाल तर परत येताना मात्र रिक्षा मीटरवर येत नाही तेथून परत यायला तुम्हाला किमान ५०० ते १००० रुपये मोजावे लागतात अशी स्थिती लोहगाव विमानतळावर आहे . विशेष म्हणजे प्रीपेड रिक्षा कॅब येथून उपलब्ध असूनही त्यांच्याही मार्फत प्रवाश्यांची अशी लुटमार होत आहे . पार्किंग साठी एरोमोल ला भाडे द्यावे लागते हे कारण देऊन प्रीपेड रिक्षा कॅब चे दर येथून मीटरपेक्षा दुप्पट अडीचपट आकारण्यात येतात.मीटर वर येथून रिक्षा येतच नाही . RTO आणि वाहतूक पोलीस हे विमान प्राधिकरणाच्या अंतर्गत होत असल्याचे कारण सांगून अक्षम असल्याचे दर्शवित आहेत . आणि विमान प्राधिकरण आमच्याकडून प्रीपेड केंद्रापर्यंत जाण्यासाठी फ्री सेवा ठेवण्यात आल्याचे सांगून याकडे दुर्लक्ष करत आल्याचे दिसत आहे. PMPML च्या बस स्थानकापर्यंत पोहोचणे प्रवाश्यांना अडचणीचे कसे होईल या दृष्टीने येथून सारा कारभार चालतो आहे . आणि मेट्रो यायला अवधी आहे तोवर हि लुट तशीच चालू राहील असे दिसते आहे.
दरम्यान पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने स्वारगेट परिसरात अवैध प्रवासी रिक्षांविरुद्ध विशेष मोहीम राबवली. वाहतूक शिस्त राखण्यासाठी आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असून, यामध्ये एकूण ३७५ केसेस नोंदवण्यात आल्या आहेत. जादा प्रवासी घेणे, भाडे नाकारणे, युनिफॉर्म न घालणे आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणे अशा विविध नियमभंगांवर कारवाई करण्यात आली, अशी माहिती वाहतूक पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिली.
ही मोहीम स्वारगेट वाहतूक विभागामार्फत स्वारगेट जेधे चौक, स्वारगेट बसस्थानकाचे इनगेट-आउटगेट तसेच स्वारगेट महामेट्रो समोर या प्रमुख ठिकाणी राबवण्यात आली. १० मार्च २०२६ रोजी झालेल्या पहिल्या कारवाईत एकूण १४६ रिक्षांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये जादा प्रवासी घेणाऱ्या १११ रिक्षाचालकांवर आणि भाडे नाकारणाऱ्या ३२ चालकांवर कारवाई झाली. तसेच, नियमभंग करणाऱ्या तीन फॉल्टी रिक्षा जप्त करण्यात आल्या.
यानंतर, १२ मार्च २०२६ रोजी स्वारगेट वाहतूक विभाग आणि पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) यांच्या संयुक्त पथकाने पुन्हा विशेष मोहीम राबवली. या कारवाईत स्वारगेट वाहतूक विभागाने एकूण १८६ केसेस नोंद केल्या. यामध्ये जादा प्रवासी घेणाऱ्या ९२ रिक्षा, भाडे नाकारणाऱ्या २१, युनिफॉर्म नसलेल्या ४८ तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या १८ रिक्षाचालकांचा समावेश होता. यावेळी सात फॉल्टी रिक्षा जप्त करण्यात आल्या. याव्यतिरिक्त, आरटीओ पुणे यांनी ४३ प्रकरणांवर स्वतंत्र कारवाई केली.
या दोन्ही दिवसांच्या कारवाईत स्वारगेट वाहतूक विभाग आणि आरटीओ पुणे यांच्या संयुक्त मोहिमेत एकूण ३७५ केसेस नोंदवण्यात आल्या.
ही कारवाई पोलिस उपायुक्त (वाहतूक) यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट वाहतूक विभागाच्या प्रभारी अधिकारी एपीआय शोभा क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. त्यांच्या पथकातील अंमलदारांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
पुणे शहर वाहतूक शाखेकडून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि वाहतूक शिस्त राखण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष कारवाया पुढेही सातत्याने राबवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, सर्व रिक्षाचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहनही वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.

