‘लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर’चे उद्घाटन
पुणे दि. १३ मार्च : ” राष्ट्रनिर्मितीसाठी राजकारण नाही तर समाजाची भागिदारी अत्यंत महत्वाची आहे. परिस्थिती आणि संघर्षामुळे प्रतिभा निर्माण होते. या प्रतिभेतूनच निर्मित झालेल्या ‘लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर’ मुळे विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडविण्याचे अद्वितीय कार्य सुरू झाले आहे. हे चारित्र्य, व्यक्ति निर्मिती व त्यातून राष्ट्रनिर्मितीसाठी अमूल्य योगदानाचे ठरेल.” असे विचार पतंजली योगपीठाचे संस्थापक व आध्यात्मिक गुरू स्वामी रामदेव बाबा यांनी केले. येथे जीवन परिवर्तन करण्याचे खूप मोठे सूत्र दडल्याचे ही त्यांनी सांगितले.
तत्वदर्शी प्रज्ञावंत वै. सौ. उर्मिला वि. कराड यांच्या स्मृति प्रित्यर्थ देशात प्रथमच उच्च शिक्षणामध्ये दौंड तालुक्यातील बोरीबेल येथे उभारण्यात आलेल्या ‘लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर’ (एलटीसी) च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामदेव बाबा बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते. तसेच ‘लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर’ चे संकल्पक व निर्माते डॉ. राहुल विश्वनाथ कराड हे उपस्थित होते.
यावेळी लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर’ (एलटीसी) च्या ब्रोशरचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी पद्मश्री पोपटराव पवार, राजीव गांधी खेल रत्न अवॉर्डी रंजन सोधी, संजीव निकम, नंदकिशार पाचपुते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच ह.भ.प. श्री.बापूसाहेब मोरे,आमदार रमेशअप्पा कराड, श्री. राजेश कराड, श्री योगेश पाटील, एमआयटी डब्ल्यूपीयूचे सीओओ डॉ. प्रसाद खांडेकर व विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.
स्वामी रामदेव बाबा म्हणाले,” जीवन परिवर्तनात शिक्षण आणि स्वयंशिस्त महत्त्वाची असते. तरुणांमध्ये प्रचंड क्षमता असते. त्यांनी आपली स्वप्ने पगार पुरतीच मर्यादित न ठेवता समाज व राष्ट्र निर्मितीसाठी योगदान देण्याची असावी. धैर्य, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या माध्यमातून निर्धारित केलेले ध्येय गाठण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत. विचार प्रणाली अत्यंत गतिशिल असल्याने आहार व विचारांप्रती सतत सजग रहावे. तसेच शरीर, मन आणि भावनांना नियंत्रित करावे.”
” डिजिटल माध्यमांमुळे मुले रोज ८ तास वेळ वाय घालवितात त्यातून त्यांना काहीच उपलब्ध होत नाही. खेड्यांमध्ये काम करण्यासारखे खूप काही आहे. येथे आदर्शग्राम व चारित्र्य निर्मितीसाठी उत्तम शिक्षण व्यवस्था उभी करावी. स्वातंत्र्यानंतर ही देशात भारतीय शिक्षण व्यवस्था पद्धत नाही. त्यासाठी कार्य करावे. असा सल्ला ही स्वामी रामदेव बाबा यांनी दिला. ”
केंद्रीय कृषि व किसान कल्याण आणि ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ऑनलाइन भाषणात सांगितले की,” जीवन परिवर्तन (एलटीसी) एक अद्वितीय उपक्रम आहे. भारताच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणातील अनुभवजन्य शिक्षणाचा गाभा आहे. भारताला बलशाली बनवण्यास, आत्मविश्वासू व राष्ट्रनिर्माते युवक घडविण्यास मदत करेल.”
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन संदेशात सांगितले की, ” दूरदर्शी विचार करुन डॉ. राहुल कराड यांनी उभारलेल्या जीवन परिवर्तन केंद्र (एलटीसी) प्रकल्पामुळे अत्याधुनिक शिक्षण व्यवस्था व समाजाला नवी दिशा मिळेल. पाच तत्वांवर आधारित केंद्र मानव कल्याणासाठी आहे.”
डॉ. राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,” कृषी(शेती) आणि निसर्ग , शारीरिक तंदुरूस्ती आणि खेळ, संघटन कौशल्य आणि नेतृत्व, देशभक्ती आणि राष्ट्रनिर्माण व अध्यात्म आणि मनःशांती या ५ स्तंभावर आधारित हे केंद्र आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धिक व मानसिक आरोग्य जोपासण्याबरोबरच जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोण विकसित करण्याचा हा शैक्षणिक क्षेत्रातील मैलाचा दगड आहे. हे केंद्र संपूर्ण भारताचे असून विद्यार्थ्यांनी येथून लाभ घेऊन बाहेर निघावे व देश परिवर्तनासाठी कार्य करावे.”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, ” भारताला विश्वगुरूच्या रुपात पाहायचे असेल तर हे केंद्र महत्वाची भूमिका बजावेल. हे केंद्र जीवनाला नवी दृष्टी देणारे आहे. देह, बुद्धि, आत्मा आणि मन या गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे. ”
रंजन सोधी म्हणाले, ” देशात सर्वच क्षेत्राबरोबर शिक्षण व्यवस्थेत ज्या प्रमाणात परिवर्तन घडत आहे. त्यासाठी जीवन परिवर्तन केंद्र महत्वाची भूमिका निभावेल. तसेच जीवनात खेळाबरोबरच संवाद अत्यंत महत्वाचा आहे. ”
या प्रसंगी राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार, चंद्रकात पाटील, आमदार दत्तात्रय भरणे व ले. जनरल धिरज सेठ (पीव्हीएसएम, एव्हीएसएम) जनरल ऑफिस कमांन्डिंग इन चीफ सदर्न कमांड यांनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या.
डॉ. गौतम बापट सूत्रसंचालन यांनी केले. डॉ. प्रसाद खांडेकर यांनी आभार मानले.

