मुंबई दि.१३: “मुंबईची परंपरा ही कष्टकरी महिलांची आहे. एकेकाळी रात्रीच्या वेळी रस्त्यांवर केवळ पुरुषांचे वर्चस्व असायचे, मात्र आज मुंबईतील महिलांनी ते चित्र बदलले आहे. सिद्धिविनायकाकडे जाण्यासाठी रात्रीच्या वेळी चालत जाणाऱ्या महिला किंवा रात्रीच्या शिफ्टवर काम करणाऱ्या महिला हे दर्शवतात की, शहराच्या सार्वजनिक जागा आता महिलांनी स्वतःच्या हक्काच्या केल्या आहेत,” असे गौरवद्गार महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काढले.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक गुंतवणूक या विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात त्या प्रमुख वक्त्या म्हणून (दि.१२मार्च)रोजी बोलत होत्या. यावेळी त्यांनी जागतिक प्रतिनिधींसमोर महाराष्ट्रातील महिला धोरणांचा प्रभावी प्रवास मांडला.
डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी आवर्जून नमूद केले की, महाराष्ट्राने देशाला पहिले महिला धोरण दिले आणि त्यानंतर आलेल्या चारही महिला धोरणांच्या प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. “केवळ धोरण कागदावर असून चालत नाही, तर त्याची अंमलबजावणी जमिनीवर होणे आवश्यक आहे.
२०१२ च्या दिल्लीतील घटनेनंतर (निर्भया प्रकरण) समाजात मोठी जागृती झाली, पण दर १० वर्षांनी एक नवीन पिढी येते, ज्यांच्यापर्यंत हे कायदे आणि हक्क पोहोचवणे आमचे कर्तव्य आहे,” असे त्या म्हणाल्या.
आपल्या अधिकारांचा महिलांच्या कल्याणासाठी कसा वापर होतो, याचे उदाहरण देताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “मी विधान परिषदेची उपसभापती म्हणून जेव्हा गृहमंत्री, मुख्यमंत्री किंवा शिक्षण मंत्र्यांना महिलांच्या सुरक्षेबाबत निर्देश देते, तेव्हा त्यांना ते गांभीर्याने घेतात. उपसभापती या घटनात्मक पदावर असल्याने माझ्या सूचनांचे रूपांतर शासन निर्णयात होते आणि प्रशासन त्या तत्परतेने स्वीकारते, याबद्दल मी सरकारचे मनापासून आभार मानते.”
एसटी बसमध्ये रात्रीच्या वेळी दिवे (Lights) सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जेणेकरून छेडछाडीच्या घटनांना आळा बसेल.
केवळ पायाभूत सुविधा सुधारून चालणार नाही, तर पोलिसांची मानसिकता बदलण्यासाठी सातत्याने जेंडर ट्रेनिंग (Gender Training) देण्यावर त्यांनी भर दिला.
”महिलांची सुरक्षा हा केवळ पोलीस विभाग किंवा एका खात्याचा विषय नाही, तर तो गृह, वाहतूक, शिक्षण, आरोग्य, परिवहन आणि नगरविकास अशा सर्व विभागांचा एकत्रित अजेंडा असावा. यासाठी मी ६ विभागांची संयुक्त बैठक घेऊन ‘सेफ्टी मेनस्ट्रीमिंग’ (सुरक्षेचे मुख्यप्रवाहीकरण) करण्याचा आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत, त्या आराखड्यात नाहीला संघटनांनी दिलेल्या सर्व्हेक्षणातील मुद्देही समाविष्ट केले आहेत” असे सांगत त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात तिराणा (अल्बेनिया) च्या महापौर अनवेला रस्तादी आणि लागोस (नायजेरिया) च्या बिम्बोला अकिनाजो यांनीही त्यांच्या शहरातील अनुभव मांडले.
या चर्चेत ‘सेफ्टीपिन’ (Safetipin) च्या कल्पना आणि सोनाली व्यास यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षित शहरांचे नकाशे तयार करण्याच्या पद्धतीवर प्रकाश टाकला.

