पुणे : समाजमाध्यमांमुळे प्रेक्षकवर्ग रंगभूमीपासून दुरावत आहे. अशाही परिस्थितीत बालरंगभूमी परिषदेच्या माध्यमातून बाल-युवा पिढी घडविण्याचे काम आम्ही करीत आहोत. या कार्यात सहकार्य करावे, अशी भावनीक साद बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष ॲड. निलम शिर्के-सामंत यांनी नवनिर्वाचित नगरसेविकांना घातली.
निमित्त होते जागतिक महिला दिनानिमित्त यशवंत नाट्य-कला मित्र परिवाराच्या वतीने आयोजित सन्मान सोहळ्याचे! कोथरूड परिसरातून निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेविकांचा आज (दि. १२) ॲड. शिर्के यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्या वेळी त्या बोलत होत्या. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बालरंगभूमी परिषदेच्या जिल्हाध्यक्ष दिपाली शेळके तसेच संयोजक राजेश्र्वरी प्रॉडक्शनचे सत्यजित धांडेकर, एस. एच. एन्टरप्रायेजसचे समीर हंमी, समर्थ कलाविष्कारचे आशुतोष वैशंपायन मंचावर होते.
ॲड. वासंती जाधव, ज्योत्स्ना कुलकर्णी, मनिषा बुटाला, दिपाली डोख, अल्पना वरपे, रुपाली पवार, ॲड. मिताली सावळेकर, मंजुश्री खर्डेकर, तेजश्री पवळे, रेश्मा बराटे यांचा या वेळी सन्मान करण्यात आला.
कामात सातत्य राखा, सुसंवाद साधा, स्वत:मधील कौशल्यांचा विकास करा, असे आवाहन दिपाली शेळके यांनी केले.
सांस्कृतिक उपक्रमांसाठी सहकार्याची अपेक्षा..
प्रास्ताविकात सत्यजित धांडेकर म्हणाले, पुण्याची ओळख सांस्कृतिक राजधानी अशी आहे. परंतु सांस्कृतिक उपक्रमांकडेच महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच कलाकारांना सहकार्य करावे, सांस्कृतिक क्षेत्राची बाजू महापालिकेत प्रभावीपणे मांडावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
आर्थिक तरतुदीसाठी प्रयत्न करू ..
लोकप्रतिनिधींनाही अनेकदा ‘नाटक’ करावेच लागते. पण महिला जी कामे करतात ती प्रामाणिकणे करीत असतात, असे सांगून मंजुर्षी खर्डेकर म्हणाल्या, कला क्षेत्रासाठी अधिकाधिक आर्थिक तरतुद मिळण्याचा आम्ही प्रयत्न करू. नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकारांच्या ज्या काही समस्या आहेत त्याही सोडविण्याचा आमचा भविष्यात प्रयत्न असेल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्ना दहिवेलकर यांनी केले.
या निमित्ताने ‘आज फिर जीने की तमन्ना हैं..’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राधिका अत्रे, विजय खापेकर यांनी लोकप्रिय चित्रपट गीते सादर करून रसिकांची वाहवा मिळविली. निवेदन डॉ. भाग्यश्री कश्यप यांचे होते.

