जन्म व मृत्यु प्रमाणपत्र प्रक्रियेबाबत आढावा बैठक
पुणे-दि. १३ मार्च २०२६
पुणे महानगरपालिकेमार्फत नागरिकांना जन्म व मृत्यु प्रमाणपत्रे जन्म किंवा मृत्यु घटनेनुसार तसेच मागणीनुसार दिली जातात. या प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी आणि भविष्यातील संभाव्य गैरप्रकार टाळण्यासाठी आज दि. १३ मार्च २०२६ रोजी दुपारी १.०० वाजता महापौर कार्यालय, पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर येथे बैठक आयोजित करण्यात आली.
सदर बैठकीस महापौर मंजुषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली माजी खासदार किरीट सोमय्या सभागृहनेते गणेश बिडकर, भाजपा शहर अध्यक्ष धीरज घाटे ,महापालिका आयुक्त नवल किशोर राम ,अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर ,सहायक पोलीस आयुक्त शैलेश शंके, आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे ,संगणक व तंत्रज्ञान विभाग प्रमुख राहुल जगताप तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालयांतील निबंधक उपस्थित होते.

बैठकीत जन्म व मृत्यु प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि काटेकोर पडताळणी आवश्यक असल्यावर भर देण्यात आला. सन २०१९ पासून केंद्र सरकारने सी.आर.एस. (Civil Registration System) प्रणालीअंतर्गत क्यूआर कोडसह प्रमाणपत्रे देण्याचे निर्देश दिले असून त्यानुसार सर्व नोंदी प्रणालीवर अपलोड करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
मालेगाव, अमरावती, भिवंडी, मुंबई आदी ठिकाणी बोगस जन्म व मृत्यु प्रमाणपत्रांच्या घटना समोर आल्यामुळे या विषयाकडे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गांभीर्याने पाहण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली
जन्म व मृत्यु दाखल्यांबाबत अधिक कडक पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
मागील पाच वर्षांत मागणीनुसार देण्यात आलेले जन्म व मृत्यु दाखले तसेच नाव बदल करून दिलेली प्रमाणपत्रे यांची पुनर्तपासणी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचना व एस.ओ.पी. नुसारच पुढील कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला.
महानगरपालिका प्रशासन व पोलीस विभाग यांनी समन्वयाने काम करून आवश्यक तपासणी आणि कारवाई करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
उशिराने मागणी करण्यात आलेल्या जन्म व मृत्यु दाखल्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे –
२०२१ : २७८
२०२२ : २६३
२०२३ : १८०
२०२४ : २४२
२०२५ : ३३१
२०२६ : ११९
या संदर्भातील सर्व प्रकरणांची आवश्यक ती तपासणी करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

