भारतीय संस्कृतीतील मूल्यनिष्ठा जोपासण्याची गरज – अभय फिरोदिया यांचे प्रतिपादन
पुणे, दि. २७ – भारतीय संस्कृतीत तसंच सर्वच धर्मांच्या मुळाशी मूल्यनिष्ठा हे सूत्र आढळतं. समाजाला चांगली दिशा द्यायची असेल तर मूल्यांशी, तत्त्वांशी प्रामाणिक राहिलं पाहिजे, असं मत ज्येष्ठ उद्योजक अभय फिरोदिया यांनी सरहद संस्थेच्या वतीने काश्मिरी संत कवयित्री लल्लेश्वरी यांच्या नावाने दिला जाणाऱ्या आठव्या‘ललदेद राष्ट्रीय पुरस्कार वितरण प्रसंगी केले.-
यंदाचा २०२४ चा लल देद राष्ट्रीय पुरस्कार १९९२ बॅचच्या केंद्र सरकारच्या सेवेतील आयआरएस अधिकारी निरुपमा कोटरू यांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. भांडारकर इन्स्टिट्यूटमधील नवलमल फिरोदिया सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात पद्मश्री प्राणकिशोर कौल, जीएसटीचे अतिरिक्त आयुक्त जसमितसिंग धांद्रा, सरहदचे अध्यक्ष संजय नहार , डॉ.शैलेश पगारिया आदी मान्यवर उपस्थित होते. ५१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि पुस्तकं असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
या प्रसंगी फिरोदिया पुढे म्हणाले, ‘भारतीय संस्कृतीत मूल्य विचार महत्त्वाचा मानला गेला आहे. धर्म ही मूल्य जोपासण्याची एक प्रक्रिया आहे. मूल्य जोपासण्याचा भाव सर्वच धर्मांनी अधोरेखित केला आहे. व्यक्तीच्या कामाचा पाया मूल्याधिष्ठित असेल तर तो स्वतःबरोबर समाजालाही चांगली दिशा देतो. ललदेद यांनीही याच मूल्यांची भाषा करत मनांना जोडण्याचे काम आयुष्यभर केले.
चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, ‘ललदेद ज्या काळात काश्मिरमध्ये होऊन गेल्या त्याच काळात महाराष्ट्रात संत परंपरा नांदत होती. संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांनी समाज जागृतीचे काम केले.शिवयोगिनी लल्लेश्वरी पासून ते शेख नरुद्दिन ऊर्फ नंद ऋषी यासंत कवीनीं काश्मीरची परंपरागत समन्वयवादी मानसिकता घडवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. हेच काम आपल्या इथल्या संत परंपरेनंही केलं आहे. समन्वयवादी परंपरेची देवाणघेवाण त्यावेळीही होत होती, हेच याचं द्योतक आहे.’
कोटरू म्हणाल्या, ‘स्वतःला ओळखण्याची ताकद कला, साहित्य आणि संस्कृतीत असते.हे सांगताना त्यांनी लल देदच्या ओळी उधृत केल्या.कोणतीही व्यक्ती संस्कृतीचा घटक असते. मी कोण, का आलो, हे समजून घेण्यासाठी हीच संस्कृती त्याला मदत करते. माझ्याही बाबतीत असंच म्हणता येईल. मी नोकरी म्हणून नाही तर पॅशन म्हणून माझ्या कामाकडे पाहते. स्वतःला अधिकाधिक ओळखण्याची ती एक संधी असते. त्यामुळंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयात नाट्य, कला, नृत्य या क्षेत्रात मी जे काही केलं त्यातून मला खूप काही शिकायला मिळालं.’
जसमीत सिंग यांनी महाराष्ट्र आणि काश्मीरचे नाते आपल्या भाषणातून अधोरेखित केले, तर ‘ललदेदचे तत्त्वज्ञान परंपरावादाला चिकटून राहणारे नाही, त्यामुळेच आजही हे तत्त्वज्ञान दुभंगलेली मनं जोडण्याचे काम करू शकते. समन्वय हाच काश्मिरी संस्कृतीचा गाभा आहे. त्यामुळे काश्मीरच्या व्यक्तीत्वाच ललदेद आहे. हाच धागा घट्ट करण्यासाठी ललदेद यांच्या नावाने पुरस्कार सुरू केल्याचे आणि हा पुरस्कार केवळ राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या काश्मीरी महिलांनाच देण्यात येतो असे संजय नहार यांनी सांगितले.
सूत्रसंचालन साची मोरे यांनी केले, तर शैलेश वाडेकर यांनी आभार मानले.
काश्मीरी अधिकारी निरुपमा कोटरू यांना चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते पुण्यात आठवा लल देद राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
Date: